गझलगायक पंकज उदास यांचे पहिलेच गणपतीवरील नवीन गाणे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरावर आधारित असून ‘जय गणेश’ नावाचे हे भक्तीगीत सीडीस्वरुपात आहे. या भक्तिगीताचे प्रकाशन प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिरात गणरायाच्या चरणी सीडी अर्पण करून करण्यात आले.
“गणपती बाप्पाच्या आगमनाला आता काही दिवसच बाकी असताना मुंबई, महाराष्ट्रबरोबरच संपूर्ण देश आणि जगातच चैतन्याची एक लहर पसरली आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांमध्ये हे चैतन्य टिपेला पोचणार आहे. मी गेली कित्येक वर्षे सिद्धीविनायकाची भक्ती करतो आहे. मला सिद्धीविनायकाच्या चरणी एक गाणे अर्पण करायचे होते आणि गेली कित्येक वर्षे ते मनात घोळत होते. आता या गाण्याच्या रूपाने ते स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे. विशाल धुमाळ यांनी अत्यंत सुंदररित्या संगीतरचना केली असून गाण्याचे अर्थपूर्ण व भक्तिपूर्ण बोल आलोक श्रीवास्तव यांनी लिहिले आहेत. मला पूर्ण खात्री आहे की, बाप्पाच्या सर्व भक्तांना माझी ही छोटी भेट नक्कीच पसंत पडेल,” असे उद्गार पंकज उदास यांनी काढले.
https://youtu.be/EsCoGHhgDRQ
आजच्या संगीतामध्ये पंकज उदास यांनी एक गोष्ट सिद्ध केली आहे की, गझल संपूर्ण जगातील संगीतरसिकांना मोहिनी घालते. शिवाय संगीत हे कोणत्याही मशीनमधून येत नसते तर ते कलाकाराच्या आत्म्यातून येणे गरजेचे असते, हेसुद्धा त्यांनी सिद्ध केले आहे. ‘चिठ्ठी आई है’ या ‘नाम’ सिनेमातील गाण्याने 1986 साली त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली. एका रात्रीत त्यांना राष्ट्रीय स्तरावरील लोकप्रियता मिळाली. या हिट गाण्यानंतर त्यांनी बॉलीवूडमध्ये अनेक लोकप्रिय गाणी गायली आणि ती अनंत काळापर्यंत रसिकांच्या मनावर गरुड करून राहतील.