खोट्या स्त्री वादावर आधारित नवा आगरी रॅप

By  
on  

सध्या समाज माध्यमांवर ताजा ट्रेन्ड असणारं वाक्य म्हणजे ‘असं कसं चालेल दीदी’ जसं की  ‘दीदी चांगला नवरा मिळावा म्हणुन सोळा सोमवार चा उपवास करते पण दीदी उपवासाच्या नावावर पातेलं भरून किचडी खाते! असं कसं चालेलं दीदी? अश्या उपहासात्मक विनोदाची व्हाॅट्सॲप,फेसबुक सारख्या समाज माध्यमात चलती आहे. मुळात मोदींनी ममता बॅनर्जी यांवर भाषणात टिका करीत ‘ऐसा कैसा चलेगा दीदी’ असे वाक्य वापरले होते तेव्हा पासुन या ट्रेन्डची चलती आहे आणि हेच दीदी पुरती मर्यादीत न रहाता दादा,आई ते थेट सरकारची दुट्टपी भुमिका अनेकांनी या ट्रेन्डच्या माध्यमातुन मांडली आहे.

ह्याच ट्रेन्डचा वापर करत थेट आगरी भाषेत सर्वेश तरे एक रॅप गाणं घेऊन येत आहेत. गाण्याचं नाव ‘असं कसं दीदी’ असुन त्याचे गीत-संगीत सर्वेश तरे यांनी केले आहे. प्रस्तुत गाणे खोटा स्त्रीवाद (pseudo feminisms) यावर आधारीत आहे. अनेक मुली समानते वर बोलत असतात परंतु काही गोष्टीत जिथे पुढाकार घ्यायला हवा तिथे माघार घेतात.रंग-रुपावरुन एखाद्याचं कर्तुत्व पारखतात. स्वत: भोवती एखादी चौकट उभी करतात किंवा एखाद्या ट्रेन्डमध्ये स्वत:ला अडकवुन घेतात. या सगळ्या गोष्टी प्रस्तुत गीतातुन मांडल्या असल्या तरी या गाण्यात मुलींनी कोणत्याही चौकटीत न अडकता जिजाऊ आणि सावित्रींच्या लेकी प्रमाणे स्वत:ला योग्य पारखायला हवं आणि स्त्रीवादी न बनता स्त्रीसंवादी बनायला हवं असा संदेशही दिला आहे.

प्रस्तुत गाण्यात सर्वेश तरे यांच्यासह प्रीती भोईर यांनी अभिनय केला असुन याचे छायाचित्रण प्रशांत पाटील यांनी केले आहे. तसेच गाण्याचे संगीत संयोजन भाग्येश पाटील यांनी केले आहे. हे गीत येत्या २९ सप्टेंबर रोजी म्हणजे नवरात्री उत्सवा निमीत्त युट्युबवर प्रकाशित होणार असुन सर्व प्रमुख संकेतस्थळांवर उपलब्ध होणार आहे. रॅप म्हणजे ठेक्यासह सादर होणार शुध्द कविताच असुन मनोरंजातुन प्रबोधन करण्याचं हे उत्तम साधन होऊ शकतं असे सर्वेश तरे यांनी ‘असं कसं दीदी,तू जीलेबी आवरी सीधी’ या रॅप निमीत्त म्हटले आहे.

Recommended

Loading...
Share