2007 साली प्रदर्शित झालेल्या चक दे सिनेमाद्वारे प्रसिध्दीच्या झोतात आलेली मराठमोळ्या सागरिका घाटगेचा लवकरच एक नवीन मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्पोर्ट्स गर्ल असलेल्या सागरिकाचा मॉन्सून फुटबॉल हा मराठी सिनेमा येतोय. यात ती फुटबॉल टीमच्या कॅप्टनची भूमिका साकारताना दिसेल. नुकताच सागरिकाचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ज्यात ती चक्क एखाद्या गृहिणीसारखी साडी नेसून आणि शूज घालून फुटबॉल खेळताना दिसतेय. त्यामुळेच या सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढलीय. मिलींद उके या सिनेमाचं दिग्दर्शन करतायत.
मॉन्सून फुटबॉल हा सिनेमा गृहिणींच्या जीवनावर आधारित आहे. यात काही गृहिणी एकत्र येत एका फुटबॉल टीमची स्थापना करतात अशी कथा आहे. हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सागरिका म्हणाली, “ जे नेहमी स्वत:चं एकतात अशा लोकांपैकी मी एक आहे. मला जो सिनेमा करावासा वाटतो तोच मी करते. मग त्याला यश मिळणार का नाही, सुपरहिट होईल का याचा विचार मी करत नाही. चक देची कथा मी फक्त एका ओळीत ऐकून त्यांना होकार कळवला होता. मॉन्सून फुटबॉल या सिनेमात मी आत्तापर्यंत कधीच न साकारलेल्या भूमिकेत तुम्हाला दिसणार आहे. महिलांसाठी हा सिनेमा प्रेरणा देणारा ठरणार असून मी याबाबत खुपच उत्सुक आहे.”
मॉन्सून फुटबॉलमध्ये सागरिका घाडगेची चक दे को-स्टार विद्या माळवदेसुध्दा झळकणार आहे. सागरिका म्हणाली पुन्हा सेटवर आमच्या दोघींची केमिस्ट्री जुळली खुपच मजा आली.
चक दे सिनेमातील प्रिती साबरवाल या महिला हॉकीपटूच्या भूमिकेसाठी सागरिका घाडगेचे प्रचंड कौतुक झालं होतं. स्पोर्ट्सवरील सागरिकाचा मॉन्सून फुटबॉल हा दुसरा सिनेमा आहे. तर मराठीतलासुध्दा हा दुसरा सिनेमा आहे. यापूर्वी ती अतुल कुलकर्णीसोबत सतीश राजवाडे दिग्दर्शित प्रेमाची गोष्ट या मराठी सिनेमात झळकली होती. पण या सिनेमाला म्हणावं तितकं यश मिळालं नाही.
सागरिकाने सांगितलं, ती अभिनेता गुलशन देवियासोबत हादसा या पुढील प्रोजेक्ट्सवर मॉन्सून फुटबॉल काम करतेय. तसंच वेब या माध्यामातसुध्दा सागरिकाला काम करण्याची आवड असल्याचं मत तिने व्यक्त केलं आहे.
मॉन्सून फुटबॉलच्या प्रदर्शनाची तारीख अद्यापतरी उलगडलेली नाही.