कॅन्सरसारख्या दुर्धर आजारातून काही दिवसांपुर्वीच रंगभूमीवर परतलेले अभिनेते शरद पोंक्षे यांचा आज वाढदिवस आहे. शरद पोंक्षे यांना डिसेंबर 2018मध्ये कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यानंतर कॅन्सरवर किमोथेरपीच्या सहाय्याने यशस्वी मात करून ते नुकतेच ‘हिमालयाची सावली’ या नाटकाच्या प्रयोगासाठी परतले आहेत.
आजवर अनेक व्यक्तिरेखांमधून अभिनयाची छाप सोडणा-या शरद यांनी काही काळ बेस्ट मेकॅनिक म्हणून काम केलं होतं. ‘वरून सगळे सारखे’ या नाटकातील भूमिकेद्वारे त्यांचा व्यावसायिक रंगमंचावर प्रवेश झाला. नाटकांनंतर मालिकामध्येही त्यांनी भूमिका साकारल्या. ‘दामिनी’ या गाजलेल्या मालिकेत त्यांचा अभिनय लक्षात राहिला. याशिवाय अग्निहोत्र, वादळवाट, कुंकू, कन्यादान, उंच माझा झोका या मालिकांमधील त्यांच्या भूमिकांचं कौतुकही झालं.
पण शरद पोंक्षे यांच्या नावासोबतचं वलय वाढलं, नथुराम गोडसे या नाटकामुळे. वादग्रस्त विषयावर बेतलेल्या या नाटकात शरद यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारलेली होती. यावेळी त्यांना या नाटकासाठी कायदेशीर लढाई तर लढावी लागली. याशिवाय धमक्यांनाही सामोरं जावं लागलं. मलिका, सिनेमा, रंगभूमी असा प्रवास सुरु असतानाच शरद यांना कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला सामोरं जावं लागलं.
यावेळी सहानुभुती नको असल्याने शरद यांनी या बाबीची वाच्यता होऊ दिली नाही. वर्षभर केमोथेरपीचे उपचार धीराने घेतल्यावर ते आता रंगभूमीवर परतले आहेत. 'हिमालयाची सावली' नाटकाद्वारे पुन्हा अभिनय करताना बघण्यास त्यांचे चाहते आणि संपुर्ण नाट्यसृष्टी उत्सुक आहे. पीपिंगमून मराठीतर्फे या जिगरबाज अभिनेत्यास वाढदिवसाच्या शुभेच्छा....