By  
on  

आळंदीचा चैतन्य देवढे बनला संजय जाधव यांचा ‘लकी’ गायक !

संजय जाधव यांच्या ‘दुनियादारी’ सिनेमातून ‘लिटील चॅम्प’ रोहित राऊतला सिनेसृष्टीत लाँच केल्यावर आता ‘राइझिंग स्टार’ चैतन्य देवढेलाही संजय जाधव लाँच करत आहेत. सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे यांची निर्मिती असलेल्या आणि संजय जाधव यांचे दिग्दर्शन लाभलेल्या ‘लकी’ सिनेमातून गायक चैतन्य देवढे सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.

संजय जाधव ह्यांच्या ‘दुनियादारी’ सिनेमातले पंकज पडघन ह्यांनी संगीत दिलेले ‘यारा यारा फ्रेंडशीपचा खेळ सारा...’  हे गाणं त्यावेळी रिएलिटी गायन स्पर्धेतील रोहितल राऊतला गाण्याची संधी मिळाली होती. आता दुस-या गुणी छोट्या गायकाला पुन्हा एकदा संजय जाधव सिनेसृष्टीत लाँच करत आहेत. ‘संगीत सम्राट’, ‘राइझिंग स्टार’ आणि यंदा ‘सूर नवा ध्यास नवा’ अशा रिएलिटी शोमधून आपल्या दमदार गायनामुळे झळकत असलेला आळंदीचा ‘चैतन्य देवढे’ ‘लकी’ बॉय ठरलेला आहे.

चैतन्यच्या निवडीविषयी फिल्ममेकर संजय जाधव सांगतात, “या गाण्याच्या सिच्युएशनसाठी आम्हाला एका लहान मुलाचा आवाज हवा होता आणि वैभव चिंचाळकरने मला चैतन्यचे नाव सुचवले. चैतन्यला आवाजाचे दैवी वरदान लाभले आहे. त्याच्यातली निरागसता मला खुप भावली.”

संगीतकार पंकज पडघन म्हणतात, “नव्या प्रतिभेसोबत काम करायला मला आणि संजय दादांना नेहमीच आवडतं. चैतन्यची आकलन क्षमता खूप चांगली आहे. त्याने एकाच दिवसात या गाण्याचा रियाज करून गाण्याचे रेकॉर्डिंग केले. त्याचे मला खुप कौतूक वाटते.”

चैतन्य देवढे म्हणतो, “मी स्वत:ला खूप ‘लकी’ समजतो, की सिनेसृष्टीतल्या अशा दिग्गजांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली. आजपर्यंत पंकज पडघन ह्यांनी संगीतबध्द केलेली गाणी ऐकली होती. आणि संजयदादांचे सिनेमे पाहिले होते. पण ह्या दोन दिग्गजांना प्रत्यक्ष भेटायची आणि त्यांच्या सिनेमातून सिनेसृष्टीत लाँच होण्याची संधी मला मिळाली, ही माझ्यावर माऊलींचीच कृपा आहे, असे मी मानतो.”

बी लाइव्ह प्रॉडक्शन्स आणि ड्रिमींग ट्वेंटीफोर सेव्हनची निर्मिती असलेला,  सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे निर्मित आणि संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’  सिनेमात अभय महाजन आणि दिप्ती सती मुख्य भूमिकेत आहेत. ‘लकी’ सिनेमा 7 डिसेंबर 2018 ला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive