अस्सल सौंदर्याची खाण आणि तितकीच सशक्त अभिनेत्री म्हणून मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवणारी स्मिता पाटील माहित नाही हे विरळाच. आजच्या पिढीलासुध्दा स्मिता पाटील यांच्या सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल तितकीच माहिती आहे. आज १७ ऑक्टोबर स्मिता पाटील यांची जयंती. त्यानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देऊया. १९७०मध्ये वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी स्मिता पाटील यांनी दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून कारकीर्दीला सुरुवात केली खरी पण अभिनयाची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. पडद्यावरील सौंदर्यांच्या साचेबद्ध कल्पना त्यांनी मोडीत काढली. हिंदी आणि मराठी दोन्ही सिनेमांमध्ये त्यांनी स्वत:चा वेगळा ठसा उमटवला आणि कधीच मागे परतून पाहिलं नाही.
दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून काम करताना त्या जीन्स आणि टीशर्टमध्ये तिथे जात असत. मात्र बातम्या देताना जीन्सवरच साडी परिधान करायच्या असे म्हटले जाते. त्या काळीसुध्दा खुपच बोल्ड आणि बिनधास्त होत्या.
अवघ्या दहा वर्षांच्या सिनेकारकिर्दीत स्मिता यांनी तब्बल ८० सिनेमे केले. पदार्पणाच्या चार वर्षांनंतर १९७७मध्ये 'भूमिका' या सिनेासाठी त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तर १९८०मध्ये 'चक्र'साठी पुन्हा एकदा राष्ट्रीय पुरस्कारावर त्यांनी आपलं नाव कोरलं. सिनेसृष्टीतील योगदानासाठी १९८५ मध्ये त्यांना 'पद्मश्री पुरस्कार' देऊन गौरव करण्यात आला.
स्मिता पाटील यांच्या 'जैत रे जैत' आणि 'उंबरठा' सिनेमातील भूमिका अजरामर आहेत. त्यांना तोड नाही. मराठी व हिंदी दोन्ही सिनेसृष्टीवर दोन दशके अधिराज्य गाजवणा-या या अभिनेत्रीने सिनेरसिकांच्या मनात स्वत:चं अढळ स्थान निर्माण केलं .
स्मिता पाटील यांचे लग्न बॉलिवूड अभिनेते राज बब्बर यांच्याबरोबर झाले होते. पण ते आधीपासून विवाहीत होते, त्यामुळे त्यांचा संसार स्मिता यांनी मोडल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. स्मिता आणि राज बब्बर यांना प्रतिक बब्बर हा मुलगा आहे. तोसुध्दा अभिनेता आहे.
अवघ्या वयाच्या 31 व्या वर्षी स्मिता यांनी जगाचा निरोप घेतला. विशेष म्हणजे त्यांच्या निधनानंतर त्यांचे जवळपास 14 सिनेमे सिनेमागृहात प्रदर्शित झाले होते.
पिपींगमून मराठीतर्फे जयंतीनिमित्त अभिनेत्री स्मिता पाटील यांना विनम्र अभिवादन!
.