संघर्षाचा काळाला सामोरे जाऊन जिद्दीने यशाची गोडी चाखणारे फार कमीजण असतात. अभिनेता सिद्धार्थ जाधवचं नाव यात अग्रक्रमाने घ्यावे लागेल. मराठी सिने आणि नाटकसृष्टीत स्वतःच्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात करणा-या सिद्धार्थने थेट बाॅलिवुडपर्यंत मजल मारली. स्वतःच्या दैदिप्यमान यशाने त्याने हिंदी सिनेसृष्टीत स्वतःची दखल घ्यायला भाग पाडलं.
सिद्धार्थ जाधवने प्रत्येक भुमिका समरसुन साकारली. आज सिद्धार्थ जाधवचा वाढदिवस. पिपिंगमुन मराठीतर्फे सिद्धार्थला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. या आहेत सिद्धार्थ जाधवच्या टाॅप 5 भुमिका
1) 'जत्रा' मधील सिद्धु
केदार शिंदे दिग्दर्शित 'जत्रा' सिनेमाने सर्वांचे मनोरंजन केले. आजही या सिनेमाची क्रेझ तेवढीच आहे. यामध्ये सिद्धार्थ जाधवने साकारलेल्या सिद्धु च्या भुमिकेचं खुप कौतुक झालं. अचुक काॅमेडी टायमिंग आणि विनोदाची जाण यामुळे सिद्धार्थ जाधवचं सगळीकडुन कौतुक झालं होतं.
2) 'दे धक्का' मधील धनाजी
कौटुंबिक विनोदी सिनेमा म्हणुन आजही 'दे धक्का'कडे पाहीलं जातं. यात सिद्धार्थने साकारलेल्या धनाजीमामाच्या भुमिकेने प्रेक्षकांना लोटपोट हसवलं. गोष्टी चोरण्याचा आजार झालेला धनाजीने प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं
3) 'खो खो' मधील आदीमानव
'लोच्या झाला रे' नाटकाने सिद्धार्थ जाधव हे नाव प्रकाशझोतात आलं. याच नाटकावर आधारीत 'खो खो' सिनेमामध्ये सिद्धार्थ जाधवने साकारलेला आदीमानव प्रेक्षकांच्या नजरेत आला. जिकडेतिकडे बेछुट उड्या मारणारा हा आदीमानव सिद्धार्थने त्याच्या सळसळत्या एनर्जीने जबरदस्त साकारला
4) 'लालबाग परळ' मधील 'गण्या'
नेहमी काॅमेडी भुमिकांमध्ये दिसणा-या सिद्धार्थ जाधवने लालबाग परळ मध्ये बोलायला चाचरणा-या आणि नंतर गुंड बनलेल्या गण्याची भुमिका साकारली. विनोद आणि गांभीर्य याचा उत्तम मेळ सिद्धार्थने या भुमिकेसाठी वापरला. सिद्धार्थच्या या भुमिकेचं सगळीकडुन कौतुक झालं.
5) 'पारध' मधील 'यशवंत'
पारध मधील सिद्धार्थने साकरलेली यशवंत ही भुमिका ही त्याच्या कारकीर्दीला कलाटणी देणारी ठरली. पुढा-याच्या हाताखाली असणारा आणि नंतर त्याचाच खुन करणारा यशवंत साकारुन सिद्धार्थने स्वतःमधल्या अष्टपैलु कलाकाराची ओळख करुन दिली.