By  
on  

पाहा रिअल लाईफ कपल अनिकेत विश्वासराव आणि स्नेहा चव्हाणचं रोमँटीक गाणं

रिअल लाईफ कपल अनिकेत विश्वासराव आणि स्नेहा चव्हाण यांचा ‘हृदयात समथिंग समथिंग’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. या सिनेमातील ‘तुझी ओढ लागली’ हे गाणं नुकतंच लाँच झालं आहे. सागर खेडेकर ह्यांचे गीत, अनिरूध्द काळे यांचे संगीत लाभलेले ‘तुझी ओढ लागली’ हे गाणं आनंदी जोशी आणि जसराज जोशी यांच्या सुमधूर आवाजात स्वरबध्द झालं आहे.

या  रोमँटिक गाण्याविषयी संगीतकार अनिरूध्द काळे सांगतात, “विनोदी सिनेमातलं हे एकुलतं एक रोमँटिक गाणं आहे. सिनेमात स्नेहा चव्हाण ही प्रिया या एका खट्याळ मुलीच्या भूमिकेत आहे. अशा खट्याळ मुलीचा रोमँस कसा असेल, हे त्या गाण्यातून प्रतीत होणं गरजेचं होतं. तो भाव आनंदीच खुप छान व्यक्त करू शकते, असा मला विश्वास होता. आणि आनंदीच्या आवाजाला जसराजचा आवाज कॉम्पिलमेन्ट करतो, असं वाटल्यामुळे या दोघांचीच निवड गाण्यासाठी झाली. या दोघांमुळेच हे गाणं खूप सुमधूर झालं आहे.”

आनंदी जोशी म्हणते, “जसराज सोबत गाणं गाण्याची एक आगळी मजा आहे. या गाण्यात तो थोडा चढ्या आवाजात गातो. तर मी सॉफ्ट आवाजात गाते. एकाच गाण्यात रोमँसमध्ये असं वैविध्य देतानाही, आमची केमिस्ट्री जुळणं हे आमच्यापुढे आव्हान होतं. आणि अनिरूध्दमुळे हे गाणं खुप छान झालंय.”

अनिकेत विश्वासराव आणि स्नेहा चव्हाणवर चित्रीत झालेल्या ह्या रोमँटिक गाण्याला सध्या युट्यूबवर चांगला प्रतिसाद मिळत आहे.

https://youtu.be/yMDaOvV5sjE

पिरॅमीड फिल्म्स हाऊस प्रस्तूत विनोदकुमार जैन, शैलेंद्र पारख, स्वप्नील चव्हाण, आणि अतुल गुगळे ह्यांची निर्मिती असलेला, सचिन संत ह्यांची सहनिर्मिती असलेला  प्रवीण राजा कारळे दिग्दर्शित, अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण, भुषण कडू, प्रियंका यादव आणि अशोक सराफ ह्यांच्या अभिनयाने सजलेला ‘हृदयात समथिंग समथिंग’  सिनेमा 5 ऑक्टोबर 2018ला रिलीज होणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive