‘शुभलग्न सावधान’ या आगामी मराठी सिनेमाव्दारे सिनेसृष्टीला एक नवा चॉकलेट बॉय मिळणार आहे. 12 ऑक्टोबरला रिलीज होणा-या ह्या सिनेमाव्दारे अभिनेता प्रतिक देशमुख सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.
मुळचा पूण्याचा असलेला प्रतिक गेली काही वर्ष अमेरिकेमध्ये स्थायिक होता. पण अभिनयाचे वेड त्याला अमेरिकेत स्वस्थ बसू देईना. प्रतिक सांगतो, “माझ्या घरात शिक्षणावर खूप महत्त्व दिलं गेलं आहे. त्यामुळे अभिनयात रस असूनही शिक्षण पूर्ण करून मी वॉशिंग्टन डिसीमध्ये सॅटेलाइट इंजिनीअरची नोकरी करत होतो. पण लहानपणापासून असलेले अभिनयाचे वेड मला परत मायदेशी घेऊन आले. आणि मी शेवटी माझ्या आवडत्या क्षेत्रात आता प्रवेश करत आहे.”
प्रतिकने ह्याअगोदर अनुपम खेर ह्यांच्या अॅक्टर प्रिपेअर्समधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे. एवढेच नाही तर ‘विशेष फिल्म्स’मध्ये सिनेमा आणि वेबसीरिजसाठी सहाय्यक दिग्दर्शकाचेही काम केले आहे. सर्वसाधारणपणे बॉलीवूडमध्ये एन्ट्री केल्यावर हिंदी सिने-टेलिव्हिजनसृष्टीतच डेब्यू करणे अभिनेते पसंत करतात. पण प्रतिकने मराठी सिनेसृष्टीतून अभिनयात पदार्पण करणं पसंत केले आहे.
प्रतिक सांगतो, “ अभिनयाची चांगली जाण असलेले उत्तमोत्त्तम कलाकार इथे आहेत. त्यामूळे अभिनयाचा पाया मजबूत करायचा असेल. तर अशा कलाकारांसोबत काम करणे गरजेचे आहे. या सिनेमामुळे मी सुबोध भावे, गिरीश ओक, निर्मिती सावंत, अशा अभिनय संपन्न कलाकारांसोबत काम करू शकलो, ह्याचा मला आनंद आहे.”