By  
on  

Birthday Special: हिंदी- मराठी सिनेसृष्टी गाजवणारा 'बापमाणूस' विक्रम गोखले

मराठी रंगभूमीने आजवर भारतीय सिनेसृष्टीला अनेक प्रतिभासंपन्न कलाकार दिले आहेत. यामध्ये अभिनेते विक्रम गोखले यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. विक्रम गोखले यांचे वडील चंद्रकांत गोखले हे मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीमधील महान अभिनेते. वडिलांपासून अभिनयाचा वारसा मिळणारे विक्रम गोखले यांचं नाव आजही घेतलं तरी त्यांच्या चाहत्यांना 'बॅरिस्टर' या नाटकामधील त्यांचा दमदार परफॉर्मन्स आठवतो. आज विक्रम गोखले यांचा वाढदिवस आहे. 

'कळत नकळत', 'सावरखेड एक गाव', 'अनुमती', 'नॉट ऑन्ली मिसेस राऊत', 'मुक्ता', 'दुसरी गोष्ट', 'नटसम्राट' आदी सिनेमांमध्ये विक्रम गोखले यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहिल्या आहेत. २०१० साली विक्रम गोखले यांनी 'आघात' या सिनेमाद्वारे दिग्दर्शकीय पदार्पण केले. या सिनेमाचं प्रेक्षक आणि समीक्षकांकडून कौतुक झालं. 

अलीकडेच विक्रम गोखले 'के दिल अभी भरा नही' या नाटकाद्वारे मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. परंतु शारीरिक कारणांमुळे विक्रम गोखले यांनी या नाटकाचे प्रयोग करणं थांबवलं.

२०१३ साली 'अनुमती' या सिनेमासाठी विक्रम गोखले यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच २०१२ साली रंगभूमीवरील योगदानाबद्दल त्यांना 'संगीत नाटक अकादमी' पुरस्कराने गौरवण्यात आले. 

विक्रम गोखले यांनी मराठीसह हिंदी सिनेमांमध्ये सुद्धा स्वतःच्या अभिनयाची चुणूक दाखवली. या अभिनयसंपन्न कारकीर्द असणाऱ्या दिग्गज अभिनेत्यास पिपिंगमुन मराठीतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive