रंगभूमी गाजवणारे नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा जीवनप्रवास “…..आणि काशिनाथ घाणेकर” या आगामी सिनेमाद्वारे रूपेरी पडद्यावर उलगडण्यात येणार आहे. वायकॉम18 मोशन पिक्चर्स प्रस्तुत या सिनेमाचं टिझर नुकतंच सोशल मिडीयवर लॉंच करण्यात आलं. “पुन्हा उघडणार पडदे , होणार टाळ्यांचा कडकडाट,
रुपेरी पडद्यावर अवतरणार मराठी रंगभूमीचा पहिला सुपरस्टार…”, असं सिनेमाविषयी उत्सुकता निर्माण करणारं कॅप्शनसुद्दा देण्यात आलं आहे. या सिनेमाचा रंगभूमीचा तो सुवर्णकाळ उभा करण्यात आला असून हा शानदार ट्रेलर पाहता 'आणि काशिनाथ घाणेकर' सिनेमाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू, अश्रूंची झाली फुले, गारंबीचा बापू, तुझे आहे तुजपाशी, सुंदर मी होणार यासारख्या अनेक दर्जेदार नाटकांमधील भूमिका आपल्या दमदार अभिनयाने अजरामर करणारे डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या अद्वितीय प्रवासाची गोष्ट आपल्याला सिनेमारुपात अनुभवता येणार आहे. सिनेसृष्टीतील गुणी अभिनेता असं स्थान निर्माण करणारा सुबोध भावे डॉ. घाणेकरांची प्रमुख व्यक्तिरेखा साकारत आहे. तसंच सोनाली कुलकर्णी, सुमित राघवन या कलाकारांच्यासुध्दा या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
अभिजीत शिरीष देशपांडे यांनी “…..आणि काशिनाथ घाणेकर” या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
https://twitter.com/Viacom18Marathi/status/1045591852814983169
ज्याच्या नावावर नाटकाला हाउसफुल्लचे बोर्ड लागत होते… ज्यांच्या नाटकाने मराठी रसिक प्रेक्षक भारावून जात होते त्या नटवर्य डॉ. घाणेकरांचा जीवनपट उलगडणारा “…..आणि काशिनाथ घाणेकर” हा सिनेमा 2018 म्हणजेच यंदाच्या दिवाळीत 8 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.