दिग्दर्शक: ऋषिकेश जोशी
कलाकार: ऋषिकेश जोशी,मोहन जोशी,रीमा लागू,स्पृहा जोशी
वेळ: 2 तास 5 मिनिटे
रेटींग : 2.5 मून
घर लहान असो किंवा मोठं प्रत्येकाला आपलं घर खुप प्रिय असतं. थकल्या भागल्या जीवाला आसरा देणारं प्रत्येकाचं घर हे एकमेव हक्काचं ठिकाण असतं. लहानसं का असेना पण स्वत: चं घरकुल असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. स्वत:च्या घरासाठी कोणीही कितीही कष्ट करायला तयार असतं तर कर्जाचा डोंगरसुध्दा ओढवून घेतो. घर म्हणजे नुसत्या दारं खिडकी असेलेल्या चार भिंती नव्हेत. तर त्यात नात्यांचा ओलावा असतो. मायेची माणसं असतात,जी आपल्याला आपण कसेही असलो तरी सामावून घेतं. आपल्या सारख्याच एका घराची ही कथा मांडणारा होम स्वीट होम हा सिनेमा आज प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांची प्रमुख भूमिका असलेला हा शेवटचा सिनेमा.
कथानक
एका मध्यवर्गीय मूलबाळ नसलेल्या आणि उतारवयाकडे झुकलेल्या एका दाम्पत्याभोवती होम स्वीट होम या सिनेमाची कथा गुंफण्यात आली आहे. श्यामल (रिमा लागू) आणि विद्याधर महाजन (मोहन जोशी) यांची ही कथा आहे. साठी पार केलेलं हे मुंबईतील एका मध्यवर्ती असलेल्या दादर येथील जुन्या इमारतीतील घरात जवळपास ३५ वर्षांपासून राहत असतात. पण गुडघेदुखीच्या त्रासामुळे श्यामल यांना लिफ्ट असलेल्या शानदार टॉवरमध्ये राहायला जाण्याची इच्छा असते. तर आठवणींचा खजीना असलेल्या या जुन्या इमारतीतच राहणं विद्याधर यांना पसंत असतं. ऋषिकेश जोशी (सोपान) हा त्यांच्या घराची उत्तम डील करुन देण्याच्या महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतोय. पण नेमकं हे घरं विकलं जातं का? हे दाम्पत्य नवीन घरात गृहप्रवेश करतात का? या घरामुळे नेमक्या कोणत्या आणि कशा नाट्यमय घडामोडी घडतात, हे तुम्ही सिनेमातच पाहायला हवं.
दिग्दर्शन
अभिनेता ऋषिकेश जोशीचा हा दिग्दर्शनातील पदार्पणाचा सिनेमा आहे. विषय आणि दिग्गज कलाकार उत्कृष्ट असले तरी सिनेमा कुठेतरी पडद्यावर मांडण्यात कमी पडला आहे. कवितांचा खुपच ओव्हरडोस झाल्यासारखा वाटू लागतो. तर एकामागोमाग एक पाहुण्या कलाकारांची रांग सहसा पचनी पडत नाही. सिनेमाचा काहीसा वेग मंदावल्यासारखा भासतो. मात्र घर या मुख्य विषयावर प्रकाशझोत टाकता टाकता एका जोडप्याच्या जीवनाचा वेध घेतो.
अभिनय
रीमा लागू आणि मोहन जोशी यांच्या सदाबहार अभिनयाने सिनेमात जान आणलीय. एका साठी पार केलेल्या दाम्पत्याच्या नात्यातील खट्याळपणा आणि एकमेकावरचं तितकचं प्रेम या जोडीने अगदी हूबेहूब साकारलं आहे. तर स्पृहा जोशी आणि ऋषिकेश जोशी यांचा अभिनय उल्लेखनीय ठरतोय.
सिनेमा का पाहावा?
संपूर्ण कुटुंबासोबतच्या मनोरंजनासाठी आणि वैभव जोशींच्या कवितांचा आस्वाद घेण्यासाठी हा सिनेमा जरुर पाहावा.
https://youtu.be/Ww5b4yVYjT4