अभिनेते नाना पाटेकर हे नाव जरी उच्चारले तरी एक प्रकारचा दरारा निर्माण होतो. बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतलं नाना हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. अनेक व्यक्तिरेखा नानांनी अक्षरश: जीवंत केल्या. नानांचा सिनेमा म्हणजे प्रेक्षकांसाठी एक मोठी पर्वणीच ठरते.
नाना हे फक्त अभिनेतेच नाही तर एक समाजसेवक, लेखक आणि निर्माते आहेत. नानांनी नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिकंली आहेत. ‘परींदा’, ‘क्रांतीवीर’, ‘अपहरण हे हिंदी सिनेमे तर ‘नटसम्राट’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ हे मराठी सिनेमे आपल्या अभिनयाने गाजवले. सिनेसृष्टीतील अमूल्य योगदानामुळे त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानीतसुध्दा करण्यात आले. चला तर, जाणून घ्या अभिनेते नाना पाटेकर या 'आपला मानूस'बद्दल तुम्हाला माहित नसलेल्या काही गोष्टी पिपींगमून मराठीवर.
मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर बनले अभिनेते
नाना पाटेकर अभिनयसम्राट आहेत, हे सर्वश्रुत आहे. त्यांच्याकडे पैसा, प्रसिध्दी सर्वकाही आहे पण आजही त्यांचे पाय जमिनीवर आहेत. त्यांना कधीच आपल्या सिनेसृष्टीतील वलयाचा गर्व वाटत नाही. असे का, असा विचार तुम्ही केला असेलच ना, फार हलाखीच्या परिस्थितीतून त्यांनी स्वत:ला सिध्द केले आहे. एक वेळ अशीही होती जेव्हा जगण्यासाठी नानांना झेब्रा क्रॉसिंग आणि सिनेमांचे पोस्टर रंगवून उदरनिर्वाह करावा लागायचा. जेव्हा नानांच्या वडिलांचा व्यवसाय बंद पडला, तेव्हा ते नोकरी करु लागले आणि त्यांना दिवसाचे 35 रु. आणि फक्त एक वेळचे जेवण मिळायचे.
आर्मी मॅन नाना
नाना पाटेकरांनी ‘प्रहार’ सिनेमातील भूमिकेसाठी तीन वर्ष लष्कराची ट्रेनिंग घेतली आणि सिनेमात अप्रतिम कॅप्टन साकारला. सिनेमानंतरसुध्दा ते लष्करात परतले आणि कारगील युध्दादरम्यान ते लष्कराच्या सेवेत कार्यरत होते. आता तुम्हाला कळलं असेलच नाना इतके वक्तशीर आणि कणखर व्यक्तिमत्त्व का आहेत ते.
नाना करतात उत्तम स्वयंपाक
तुम्हाला हे जाणून नक्कीच आश्चर्य वाटेल की, नाना उत्तम स्वयंपाक करतात. हो त्यांना स्वयंपाक करायला खुप आवडतं आणि ते विविध पदार्थसुध्दा बनवतात. ते स्वत: स्वयंपाक बनवून आपल्या मित्र मंडळींना खाऊ घालतात.
मुलाला लॉन्च करण्यासाठी स्वत:ची ताकद कधीच वापरली नाही
नानांचा मुलगा मल्हार हासुध्दा अभिनेता आहे. परंतु सिनेसृष्टीत स्थिरस्थावर होण्यासाठी या नटसम्राटाने त्याला कधीच मदत केली नाही. आपल्या मेहनीच्या आणि संघर्षाच्या जोरावर मल्हारने सिनेसृष्टीत आपलं स्थान निर्माण करावं असं नानांचं मत आहे. मल्हारने स्वत:चा मार्ग स्वत: तयार करावा असं नाना नेहमी म्हणतात.
शेतक-यांच्या सेवेचं व्रत
नाना स्वत: शेतकरी असल्याने शेतक-यांच्या कष्टाची त्यांना खुप जाणीव आहे. अभिनेता मकरंद अनासपुरेसोबत नानांनी ‘नाम’ या सेवाभावी संस्थेची स्थापना करुन महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतक-यांना मदतीचा हात दिला आहे. आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या पत्नींना त्यांनी शिवणमशीन भेट दिल्या. तसेच मागच्यावर्षी त्यांनी 62 दुष्काळग्रस्त कुटुंबियांना प्रत्येकी 15,000 रुपयांचा धनादेश सुपूर्त करत त्यांच्या दुख:त खारीचा वाटा उचलला.