By  
on  

समृद्धी पोरे दिग्दर्शित ‘मला आई व्हायचंय’ सिनेमाचा बनणार हिंदी रिमेक

मराठी सिनेमांनी जगभरातील फिल्ममेकर्सना भुरळ घातली आहे. अॅड. समृद्धी पोरे यांच्या दिग्दर्शनातील पदार्पणाचा पहिला सिनेमा ‘मला आई व्हायचंय’. या सिनेमाचा विषय होता ‘सरोगसी’ म्हणजेच गर्भ भाडयाने देणे /घेणे. ज्यावेळी या विषयावर जास्त बोललंही जात नव्हतं तेव्हा या विषयावर त्यांनी ह्या सिनेमाची कहाणी लिहिली, दिग्दर्शक म्हणून काम पाहिले व अशा विषयावर कुणीच निर्माता मिळत नाही पाहून स्वत:च निर्मिती क्षेत्रातही पहिले पाऊल टाकलं आणि पदार्पणातच त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार,राज्य पुरस्कार व आंतरराष्ट्रीय पुरस्कारसुध्दा पटकावले. आज मात्र तब्बल आठ वर्षानंतर याच सिनेमाचा हिंदीत रिमेक होत आहे.

पूर्वी गाजलेल्या हिंदी सिनेमाची कॉपी बऱ्याचदा मराठीत केली जात असे पण मराठीचा हिंदीत रिमेक होऊन जास्तं दर्शकांपर्यंत सिनेमे पोहचणे ही खरच अभिमानाची गोष्ट आहे. ‘मला आई व्हायचंय’ हा सिनेमा निर्माता दिनेश विजान यांनी विमानात पाहिला आणि इतका सुंदर सिनेमा मराठी शिवाय इतर लोकांपर्यंत पोहचला कसा नाही याबद्दल खंत वाटली. त्यांना ही कहाणी ऑस्कर विजेता गास डेविसच्या "लायन" या सिनेमासारखी वाटली.

‘स्त्री’ या सिनेमाचे दिग्दर्शक अमर कौशिक आणि निर्माता दिनेश विजान यांनी ‘मला आई व्हायचंय’ या मराठी सिनेमाचा हिंदी रिमेक बनवण्याची इच्छा जाहीर केली. त्यानुसार अॅड. समृद्धी पोरे यांनी त्यांना कायदेशीर हिंदी रिमेकचे राईट दिलेत. यामधे हिंदीत आणि हॉलीवूडमधल्या गाजलेल्या नायिका काम करणार आहेत. कहाणीचे लेखन स्वतः समृद्धी पोरे करणार आहेत. हिंदी सिनेमाच्या कामाला सुरवात झाली आहे आणि लवकरच शूटिंगला सुरुवात होणार आहे.

‘मला आई व्हायचंय’ या सिनेमाद्वारे दिग्दर्शनाकडे वळलेल्या समृद्धी पोरे या पेशाने वकील आहेत. हायकोर्टात प्रॅक्टीस करत असताना त्यांच्याकडे एक केस आली. प्रचंड भावनिक गुंतागुंत असलेल्या या केसचा विषय खूप महत्त्वाचा असून त्यावर सिनेमा होऊ शकतो हे समृद्धी पोरे यांना जाणवलं. त्यानंतर त्यांनी मोठ्या धाडसाने वकीली करत असतानाच ‘मला आई व्हायचंय’ या सिनेमाचं लेखन दिग्दर्शन निर्मिती ही केली. समीक्षकांसह प्रेक्षकांनी गौरविलेल्या या सिनेमाने अनेकांना भुरळ घातली. त्यानतरचा ‘डॉ प्रकाश बाबा आमटे’ या सामाजिक सिनेमाने त्यांना प्रसिद्धी व पुरस्कार मिळवून दिलेत. आता त्यांचा ‘हेमलकसा’ हा हिंदी सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.

एखादी चांगली कलाकृती सर्वदूर पोहोचवण्यासाठी योगायोग जुळून यावे लागतात. असेच योगायोग ‘मला आई व्हायचंय’ च्या बाबतीत जुळत गेले आणि आता या सिनेमासाठी हिंदीची कवाडं खुली झाली आहेत. या सिनेमाच्या हिंदी रिमेक बनण्याची कागदोपत्री कारवाई पूर्ण झाली असून लवकरच सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive