By  
on  

‘हॉर्न ऑके प्लिज’चे दिग्दर्शक राकेश सारंग म्हणाले तनुश्री दत्ताने नानांवर केलेले आरोप धादांत खोटे

तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर प्रकरणावर दिवसेंदिवस संमिश्र प्रतिक्रिया येत असल्याचे आपण पाहतोय. यामुळे तनुश्री आणि नानांची बाजू घेणारे दोन गट सध्या बॉलिवूड आणि एकूणच सिनेइंडस्ट्रीत असल्याचे दिसतायत. पण या संपूर्ण प्रकरणावर प्रथमच ज्या सिनेमादरम्यान हा सर्व तथाकथित प्रकार घडल्याचं बोललं जात आहे त्या ‘हॉर्न ओके प्लिज’ सिनेमाचे दिग्दर्शक राकेश सारंग यांनी पिपींगमून मराठीशी बोलताना तनुश्रीने नाना पाटेकरांवर लावलेल्या गैरवर्तवणूकीचे आरोप हे धादांत खोटे असल्याचं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सुध्दा याच्याशी काहीही संबंध नाही, असं ते म्हणाले.

राकेश सारंग सांगतात, “बरेच दिवस हे प्रकरण मी प्रसिध्दी माध्यमांतून पाहतोय. याला बरंच कव्हरेज देण्यात येतंय. पण प्रथमच मी त्या सिनेमाचा दिग्दर्शक म्हणून काही गोष्टी सांगू इच्छितो. 2008 साली आम्ही हॉर्न ओके प्लिज नावाचा सिनेमा करत होतो. यातील एका आयटम सॉंगसाठी तनुश्रीला फायनल करण्यात आलं होतं. सर्वप्रथम ती कोरिओग्राफर गणेश आचार्यबद्दल खोटं बोलली आहे. ती म्हणाली की तिच्यामुळे गणेशला या सिनेमात कोरिओग्राफी करण्याची संधी मिळाली. तर तसं अजिबातच नाही. माझी पत्नी संगीता आणि गणेश आचार्य हे दोघंही पूर्वी सरोज खान यांच्याकडे असिस्टंट होते. तिथपासूनच त्यांची ओळख होती. या गाण्यासाठी माझ्या पत्नीनेच गणेशचं नाव सुचवलं होतं.”

आयटम सॉंगच्या संपूर्ण प्रकरणाबद्द्ल बोलताना दिग्दर्शक राकेश म्हणाले, “ हे गाणं फिल्मीस्थानमध्ये शूट होत होतं. यासाठी तीन दिवसांचं शेड्यूल ठेवण्यात आलेलं. 250 डान्सर आणि 500 च्या वर गर्दी जमली होती. त्यामुळे पहिल्या दिवशी तनुश्रीच्या एन्ट्रीवर प्रचंड शिट्या आणि टाळ्या, कॉमेंट्स येत होत्या. पण मी त्या गर्दीवर ओरडून ते त्वरितच थांबविण्यास सांगितलं. तर दुस-या दिवशी नाना सेटवर आले. तनुश्री होतीच. सर्वकाही छान मजा-मस्तीत शूट सुरु होतं. एकूणच खेळकर वातावरणात काम सुरु होतं.”

राकेश सारंग सांगतात, “ तिस-या दिवशी तनुश्री जेव्हा सेटवर आली तेव्हा तिचा मूड जरा बदलेला दिसता होता. आम्हा उपस्थित सर्वांनाच ते जाणवलं. त्यानंतर तिच्या मेकअपमनने मला तिच्या व्हॅनिटीत येण्यास सांगितलं. माझ्या पायाला तेव्हा फ्रॅक्चर असल्याने मला जरा ते शक्य नव्हतं. म्हणून तिलाच मी इथे बोलाविण्याची विनंती केली. तर ती आली नाही. मग मीच हळूहळू तिच्या व्हॅनमध्ये गेलो तर माझ्याकडे रागाने पाहात तनुश्रीने अर्वाच्य भाषेत नानाबद्दल बोलायला सुरुवात केली आणि मी त्याच्याबरोबर शॉट देणार नसल्याचं सागितलं. तसंच फारच बोलता येऊ शकत नाहीत असे शब्द तिने उच्चारले. मी तिला तुझा याबाबत काही गैरसमज झाला असल्याचे सांगून बाहेर आलो.”

या घटनेबद्दल बोलाताना राकेश सारंग पुढे म्हणाले, “ पुढील डान्सचा सिक्वेन्स नानासोबत होता. पण ती सारखी मी करणार नाही म्हणून चार तास ती व्हॅन लॉक करुन बसली होती. आम्ही सर्व तिला समजाविण्याचा प्रयत्न करत होतो, पण ती दारच उघडत नव्हती. पण अखेर ती बाहेर आली आणि मी करणार नाही म्हणत निघून गेली. सेटवर प्रेसला आम्ही बोलवलं नव्हतं. ते कसे आले माहित नाही. 2008 साली दीड कोटी रुपयांचं आयटम सॉंग करणं ही खुप मोठी गोष्ट होती.”

तनुश्रीच्या व्हायरल व्हिडीओबद्दल राकेश म्हणतात, “ रागारागने बाचबाची करत निघूनजाताना एका प्रेसवाल्याच्या पायावरुन तिची गाडी केली,. एकाचा कॅमेरा फुटला. त्यामुळे चिडलेले पत्रकार तिच्यामागे धावले. जो काही राडा झाला तो ती आणि पत्रकारांमध्ये. नानाला जेव्हा या घडलेल्या प्रकारबद्दल कळलं तेव्हा नानाच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला ती तर माझ्या मुलीसारखी.”

Recommended

PeepingMoon Exclusive