अभिनेत्री तनुश्री दत्ता काही दिवसांपासून जे अभिनेते नाना पाटेकरांवर तथाकथित आरोप नाट्य सुरु असतानाच त्यात तिने महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरेंचं नाव घेतलं आहे. त्यामुळे मनसैनिक प्रचंड खवळले असून त्यांनी तडक लोणावळा येथील बिग बॉसच्या सेटवर आपला मोर्चा वळवला आहे.
राज ठाकरेंवर केलेल्या आरोपामुळे मनसे कार्यकर्त्यांनी बिग बॉसमध्ये जर तनुश्री दत्ताला प्रवेश दिला तर तुमचा स्टेज उखडून टाकू असा धमकीवजा इशाराच दिला आहे. नाना पाटेकरांवर आरोप करता करता तनुश्रीने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर तोंडसुख घेतलं होतं. ती म्हणाली होती बाळासाहेबांच्या खुर्चीसाठी राज ठाकरे हे गुंडगिरी करत आहेत.
दरम्यान मंगळवारी तनुश्री दत्ताच्या बेताल वक्तव्याचा निषेध करत लोणावळा येथील मनसे विद्यार्थी सेनेने बिग बॉसच्या सेटवर जात तनुश्रीला शोमध्ये सहभागी करून घेतल्यास तोडफोडीसाठी सज्ज राहा असा इशाराच दिला आहे.
तसंच जर तनुश्री दत्ता बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठी इथे आली तर लोणावळा शहरतर्फे बिग बॉसला धडा शिकवण्यात येईल,अशी धमकीसुध्दा दिली गेली आहे. तनुश्रीला प्रवेश दिला तर जे काही परिणाम होतील त्याची जबाबदारी कलर्स वाहिनीची असेल असाही इशारा यावेळी देण्यात आला. तसेच यावेळी तनुश्री दत्ताला सेटवर प्रवेश देऊ नये यासंदर्भात एक पत्रही देण्यात आले.
यावेळी मनविसे लोणावळा शहराध्यक्ष अक्षय जाचक, अविनाश जांभुळकर, विजय भानूसघरे, महिला आघाडी अध्यक्ष संगीताताई गुजर, संतोष शिंत्रे, सरपंच संतोष खराडे, सागर शेरकर, सुमित उके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.