By  
on  

सामाजिक भान जपत आदिती द्रविड साजरा करतेय यंदाचा नवरात्रौत्सव

नवरात्रौत्सव प्रत्येकजण वेगवेगळ्या पध्दतीने साजरा करतात. कोणी देवीची आराधना, घटस्थापना, उपवास, देवदर्शन, आणि देवीचा जागर करून तर कोणी भोंडला, हादगा खेळून नवरात्रौत्सव साजरा करतात. व्यक्ती तितक्या प्रकृती ह्या न्यायाने नवरात्रौत्सव साजरा करण्याच्याही वेगवेगळ्या पध्दती आहेत.

‘माझ्या नव-याची बायको’ फेम अभिनेत्री आदिती द्रविड मात्र यंदा नवरात्रौत्सव खूपच वेगळ्या पध्दतीने साजरा करत आहे. आदितीच्या ‘यु एन्ड मी’ अल्बमला सध्या चांगला प्रतिसाद मिळतोय. एकिकडे प्रसिध्दीच्या झोतात असतानाच अदितीने समाजाचं देणं, समाजालाच परत करण्यासाठी आपली ‘फ्लाय हाय’ ही समाजसेवी संस्था सुरू केली आहे. आपल्या ह्या संस्थेव्दारे तिने समाजोपयोगी कामं हाती घेण्याचा संकल्प सोडलाय. नुकतेच तिने पूण्याजवळच्या किर्कवाडीमधल्या ज्ञानज्योती विद्यामंदिर शाळेतल्या मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन असलेले स्वयंचलित मशीन दान केले आहे.

आदिती म्हणते, “नवरात्रीला आपल्याकडे कन्यापूजा करण्याचा रिवाज आहे. ही माझ्या पध्दतीने थोड्या वेगळ्या प्रकारची कन्यापूजा आहे. मला जेव्हा पहिल्यांदा मासिक पाळी आली. तेव्हा आई घरात नव्हती. आणि मला होणा-या त्रासाबद्दल मी बाबांशी बोलले होते. माझ्या घरात मोकळं वातावरण असल्याने हे शक्य होतं. पण बाकी मुली अशा पध्दतीने आपले वडिलच काय ब-याचदा आई-बहिण-मैत्रीणीशीही बोलायला लाजतात. सॅनिटरी नॅपकिनविषयी छोट्या गावातल्या मुलींना माहितीही नसते.”

आदिती पूढे सांगते, “ब-याच काळापासून ही गोष्ट माझ्या मनात होती. म्हणूनच माझ्या समाजसेवी संस्थेव्दारे पहिलं काम हाती घेताना मी पूण्याजवळच्या ज्ञानमंदिर शाळेची निवड केली. सॅनिटरी नॅपकिन मशिन दिल्यावर तिथल्या मुलींच्या चेह-यावरचा आनंद आणि त्यांनी स्वत:च्या हाताने माझ्यासाठी लिहीलेलं थँक्यु ग्रिटींग कार्ड मला खूप काही सांगून गेलं. हजार कन्यापूजेपेक्षा 100 मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन मशीन देण्याचे समाधान मी शब्दात सांगू शकत नाही.”

Author

Recommended

PeepingMoon Exclusive