'डॉ. काशीनाथ घाणेकर' या सिनेमाने मराठी बॉक्स ऑफीसवर कोटीच्या कोटी उड्डाणेच घेतली नाही तर सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. सुबोध भावे, प्रसाद ओक, सुमीत राघवन, सोनाली कुलकर्णी, वैदही परशुरामी, मोहन जोशी अशा दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने सजलेला सिनेमाने सर्वांवरच गारुड केलं. या सिनेमाचे लेखक-दिग्दर्शक अभिजीत देशपांडे पुन्हा नव्या कलाकृतीसह प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाले आहेत. सध्या ऐतिहासिक सिनेमांचा जणू सिनेसृष्टीत ट्रेंडच आला आहे. इतिहासातल्या महत्त्वाच्या आणि लक्षवेधी पराक्रमाच्या घटनांवर सिनेमे आणण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. अभिजीत देशपांडेसुध्दा अशीच एक पराक्रमी घटना पडद्यावर साकारणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचे वीर बाजी प्रभू देशपांडे यांची पराक्रम आणि बलिदानाची अमर कहाणी अभिजीत देशपांडे मोठ्या पडद्यावर जिवंत करणार आहेत. मराठेशाहीचा इतिहास बदलून टाकणा-या त्या एका रात्रीची कहाणी असलेला 'पावनखिंड' हा ऐतिहासिक सिनेमा पुढील वर्षी 2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.