बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेला मिळणार का बिग बॉस12ची वाईल्ड कार्ड एन्ट्री?

By  
on  

पहिल्या-वहिल्या बिग बॉस मराठीच्या पर्वाची विजेती अभिनेत्री मेघा धाडे हिने सर्व स्पर्धकांवर मात करत या शिर्षकावर आपलं नाव कोरलं. भाडणं, रुसवे-फुगवे आणि बिग बॉसचे टास्क या सर्वांत मेघाचा सहभाग प्रचंड महत्त्वाचा ठरला. या रिएलिटी शोमुळे ती घराघरांत लोकप्रिय ठरली. पण आता एक महत्त्वाची बातमी म्हणजे प्रेक्षकांची लाडकी मेघा लवकरच पुन्हा त्यांना भेटण्यासाठी सज्ज झाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, बिग बॉस मराठीचं पहिलं पर्व गाजवणारी अभिनेत्री मेघा धाडे लवकरच हिंदी बिग बॉस 12 या शोमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री करण्याची शक्यता आहे. या आठवड्यात दोन वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार असून त्यातील एक नाव मेघा धाडे आहे. यापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा व टीव्ही स्टार रश्मी देसाई आणि टिना दत्ता यांची नावं चर्चेत होती. पण किम शर्मा आणि रश्मी देसाई या दोघींनीसुध्दा आपण बिग बॉसमध्ये सहभागी होणार नसल्याचा खुलासा पिपींगमून डॉट कॉमशी बोलताना केला.

मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बेघर झाल्याने कदाचित मेघाला घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळण्याची जास्त शक्यता दिसून येत आहे. प्रेक्षकांनासुध्दा आता हे जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.

बिग बॉस 12 चा हा वाईल्ड कार्ड एन्ट्री स्पेशल एपिसोड येत्या 22 ऑक्टोबरला प्रसारित होणार असून, तोपर्यंत आपल्याला फक्त वाटच पाहावी लागेल.

Recommended

Loading...
Share