सुमधूर गळ्याची गायिका सावनी रविंद्रचा ‘दीदी’ हा शो नुकताच मुंबईत लाँच झाला. गानसम्राज्ञी लता मंगेशकरांच्या सांगितिक कारकिर्दीवर आधारीत ‘दीदी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची संकल्पना आणि प्रस्तुती गायिका सावनी रविंद्रनेच केलेली आहे.
गानसरस्वती लता मंगेशकर आणि मेलोडी क्विन आशा भोसले ह्यांच्या गाजलेल्या गीतांचा नजराणा घेऊन ह्या अगोदर ‘लताशा’ कार्यक्रमाची निर्मिती सावनीने केली होती. त्यामध्ये सावनीच्या आवाजातल्या सुरेल गीतांसोबतच दस्तुरखुद्द पंडित हृदयनाथ मंगेशकरांकडून त्या गाण्यांविषयीचे विरेचन ऐकायला मिळणे ही कानसेनांसाठी पर्वणीच होती. आता ‘दीदी’ ह्या हिंदी कार्यक्रमामध्ये सावनीच्या गीतांसोबतच अभिनेता पुष्कर श्रोत्रीचे प्रभावी निवेदन ही कानसेनांसाठी मेजवानीच ठरतेय.
दीदी कार्यक्रमाच्या संकल्पनेविषयी गायिका सावनी रविंद्र म्हणते, “अलौक आणि दैवी आवाजाच्या लतादीदींचा 90वा वाढदिवस आपण साजरा केला. त्यांच्या देदीप्यमान कारकिर्दीला माझ्याकडून मानाचा मुजरा करावा असं वाटल्याने ह्या कार्यक्रमाची निर्मिती केली. दीदींचे हिंदी सिनेसृष्टीच्या योगदानतल्या महत्वाच्या गाण्यांचा समावेश ह्या कार्यक्रमात करण्यात आला आहे. त्यांच्या कारकिर्दीतल्या निवडक तीस गाण्यांचा समावेश ह्या कार्यक्रमात करण्यात आलाय.”
सावनी रविंद्र पूढे म्हणते, “दीदींची गाणी गाणे हे एक शिवधनुष्य उचलण्यासारखे आहे. पण हे चॅलेंज उचलायला मला आवडतं. ह्या वर्षाच्या सुरूवातीला पूण्यामध्ये कानसेनांनी कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिल्यावर मायानगरी मुंबईनेही भरघोस प्रतिसादाने पाठ थोपटल्याने आता ह्या कार्यक्रमाचे अजून शो करण्यासाठी हुरूप आला आहे.”