'रंगीला' सिनेमातून तमाम सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या उर्मिला मातोंडकरला खरी ओळख या सिनेमामुळेच मिळाली. आज या 'मस्त' गर्लचा वाढदिवस. बालकलाकार म्हणून उर्मिलाने हिंदी सिनेसृष्टीतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. आज उर्मिला कलाविश्वात फारशी सक्रिय नसली तरीदेखील तिच्याविषयीच्या चर्चा रंगतात. मध्यंतरी तर तिने राजकारणात प्रवेश केला होता. पण त्यात तिला अपयश आलं.
उर्मिला, राम गोपाल वर्मा यांच्या ‘रंगीला’मुळे एका रात्रीत प्रसिध्दीच्या शिखरावर जाऊन पोहचली. अभिेनत्री होण्याचं स्वप्न उराशी बाळगलेली एक सामान्य मुलगी तिने पडद्यावर जिवंत केली. तर ‘जुदाई’ सिनेमातील श्रीदेवीच्या तोडीस तोड अभिनय उर्मिलाने केला. राम गोपाल वर्माच्या ‘सत्या’ या चित्रपटात तिने आपल्या अभिनयाने सगळ्यांची वाहवा मिळवली होती. तर ‘चायना गेट’सिनेमातील ‘छम्मा- छम्मा’ हे आयटम साँग आजही रसिकांच्या पसंतीस उतरतं.
‘भूत’, ‘प्यार तुने क्या किया’यातील उर्मिलाच्या भूमिकासुध्दा लक्षवेधी ठरल्या. 90 चं दशक गाजवणा-या उर्मिलाचं आणि 'रंगीला' दिग्दर्शक राम गोपाल वर्माच्या अफेअरच्या चर्चा त्या काळी प्रचंड रंगल्या. त्यानेच उर्मिलाला एक नायिका म्हणून सर्वांसमोर आणलं. तिच्या यशात त्याचा फार मोठा वाटा आहे.
पण पुढे राम गोपाल वर्मामुळेच उर्मिलाच्या करिअरला उतरती कळा लागली. त्याचं इतर दिग्दर्शक-निर्मात्यांसोबत फारसं पटत नसे त्यामुळेच त्याचा फटका उर्मिलाच्या कारकिर्दीला बसला.
वयाच्या 42 व्या वर्षी उर्मिलाने कश्मिरी मॉडेल आणि उद्योगपती मोहसीन अख्तर मीर याच्यासोबत लग्नगाठ बांधली. दोघांची सिनेनिर्मिती संस्थासुध्दा आहे. त्यांनी मागील वर्षी सोनाली कुलकर्णी 'माधुरी' नावाच्या मराठी सिनेमाची निर्मितीसुध्दा केली.