"जिथे रिंकू तिथे गर्दी"... हे आता जणू एक समीकरणच झाले आहे. मग एखादया चित्रपटाचे चित्रीकरण असो किंवा मग एखादा कार्यक्रम सोहळा.... रिंकूची एक झलक पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांची गर्दी ही होतेच. मग त्याला 'मेकअप' चित्रपट तरी कसा अपवाद ठरेल? पुण्यातील खराडीमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार असून रिंकू स्वतः येणार असल्याची बातमी गावात पसरली आणि अख्ख गाव रिंकूला बघण्यासाठी चित्रीकरण स्थळी पोहोचले. या जमावामुळे चित्रीकरणात इतक्या अडचणी येत होत्या की चित्रीकरण अक्षरशः रद्द करण्याची वेळ आली.
या अनुभवाबद्दल दिग्दर्शक गणेश पंडित म्हणाले, '' या दिवशी रिंकू गावात चित्रीकरणासाठी येणार असल्याची माहिती तिच्या चाहत्यांना मिळाली आणि त्यांनी शूटिंगच्या ठिकाणी तिला गराडाच घातला. रिंकूसोबत फोटो काढण्यासाठी सर्वांचीच धडपड सुरु होती. आमचं चित्रीकरण सुरू झालंच नाही, पण लोकांनी आपल्या फोनवर रिंकूचं चित्रीकरण मात्र केलं.... एकंदरच सगळा गोंधळ सुरु होता. आमच्या टीममधील प्रत्येकाचा ही गर्दी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु होता, मात्र तो असफल ठरत होता. अखेर शूटिंग रद्द करून आम्ही रिंकूला हॉटेलवर नेण्याचा निर्णय घेतला. तर तिथेही काही वेगळी परिस्थिती नव्हती. हॉटेलबाहेरही चाहत्यांची गर्दी रिंकूच्या प्रतीक्षेत पोहोचली होती. रात्रभर ही गर्दी तशीच उभी होती. मात्र रोजरोज चित्रीकरण थांबवणे शक्य नसल्याने अखेर दुसऱ्या दिवशी योग्य खबरदारी घेऊन आम्ही चित्रीकरण सुरळीत पार पाडले.'' अवघ्या महाराष्ट्रभर रिंकूचे चाहते असल्याने अशा परिस्थितीचा सामना रिंकूला अनेकदा करावा लागतो. मात्र आज चाहत्यांच्या प्रेमामुळेच रिंकू इथंवर आल्याने रिंकूही आपल्या चाहत्यांना नाराज नाही करत.
येत्या ७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'मेकअप' या चित्रपटात रिंकू राजगुरू एका वेगळ्याच आणि नवीन रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत चिन्मय उदगीरकर, प्रतिक्षा लोणकर, मिलिंद सफई, राजन ताम्हाणे, सुमुखी पेंडसे, स्वाती बोवलेकर, तेजपाल वाघ यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट, बाला इंडस्ट्रीज अँड एंटरटेनमेंट प्रा. लि., शेमारू एंटरटेनमेंट लि. आणि ग्रीन ॲपल मीडिया प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माता दीपक मुकूट, बी. बालाजी राव, हिरेन गाडा, नीरज कुमार बर्मन, अमित सिंग आहेत तर केतन मारू, कलीम खान सहनिर्माता आहेत. मेकअप हा फक्त चेहऱ्याचाच नसून तो विविधांगी असतो, असा संदेश देणाऱ्या या चित्रपटाचे लेखनही गणेश पंडित यांनीच केले आहे.