31 ऑक्टोबर हा दिवस जगभरात 'हॅलोवीन डे' म्हणून साजरा करतात. सेलिब्रेटींपासून ते सामान्यांपर्यंत सर्वांनीच विविध भयावह वेशभूषा करून मोठ्या धूमधडाक्यात हा दिवस सेलिब्रेट केला. कॉलिफोर्नियामध्ये राहणा-या मराठीतील दिग्गज अभिनेत्री अश्विनी भावे यांनीसुध्दा 'हॅलोवीन डे' खास पध्दतीने साजरा केला.
'हॅलोवीन डे'बद्दल अश्विनी भावे म्हणाल्या, "कॉलिफोर्नियामध्ये हा ऋतू बदलाचा काळ आहे. झाडाची पाने रंग बदलत असतात. आणि वातावरण आल्हाददायक असते. फेस्टिव सिझनला 'हॅलोवीन'ने सुरूवात होते. महाराष्ट्रात जशी गणपती-नवरात्र-दसरा-दिवाळी ह्या सणाांची लगबग सुरू होते, तशीच लगबग इथे 'हॅलोवीनपासून सुरू होते. हॅलोवीनननंतर थॅंक्सगिविंग, ख्रिसमस आणि मग नववर्षापर्यंत सर्वत्र सळसळता उत्साह असतो. 'हॅलोवीनच्यावेळी जेवढी भीतीदायक सजावट करता येईल. तेवढी करण्यामागे प्रत्येकाचा भर असतो. मुलांची तर चंगळ असते. प्रत्येकाला ज्या ज्या घरी जातील. तिथून कॅन्डीज मिळतात."
अश्विनी भावे पुढे सांगतात, " नुकताच आमच्याकडे 'पमकिन फेस्टिवल' झाला. त्यामध्ये वेगवेगळ्या लहान-मोठ्या आकाराचे भोपळे विकायला असतात. तो अनुभवण्यासरखा असतो. हॅलोवीनसाठी दारापूढे सजवायला तिथून मी काही भोपळे घेऊन आले."
'हॅलोवीनची' एक खास आठवण काढत अश्विनी भावे खळखळून हसल्या, "मी दरवर्षी माझ्या कुटुंबासोबत हॅलोवीन सेलिब्रेट करते. माझी मुलं लहान होती, तेव्हाची एक आठवण आहे. मस्ती म्हणून त्यांना मी हडळीसारखा आवाज काढून किंवा हसून दाखवायचे. तेव्हापासून आजतागायत ती दोघंही त्या विशिष्ठ आवाजाला एवढी घाबरतात. की, मला तसा आवाज न काढण्याची सक्त ताकिद देतात."