वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट्स घेऊन रसिकांसमोर येणारी अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे. आपल्या सहज-सुंदर अभिनयातून ती नेहमीच चाहत्यांची मनं जिंकते. छोट्या पडद्यापासून मृण्मयीने सुरु केलेला हा प्रवास रुपेरी पडद्यावर यशस्वीपणे सुरु आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'फतेशिकस्त' या ऐतिहासिक सिनेमातून मृण्मयीने पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली.
आता मृण्मयी आपल्या कारकिर्दीच्या नव्या इनिंगसाठी सज्ज झाली आहे. फ्रेश स्टारकास्ट घेऊन आजच्या पिढीला रिलेट करणारा 'मन फकीरा' हा नवा-कोरा सिनेमा घेऊन मृण्मयी चाहत्यांच्या भेटीला येत आहे. पण या सिनेमात ती नायिका म्हणून नाही तर या सिनेमाची लेखिका आणि दिग्दर्शिका या नव्या रुपात रसिकांसमोर येतेय. या सिनेमाचं सध्या जोरदार प्रमोशन सुरु आहे. या प्रमोशनसाठीच मृण्मयीने खास खणाची साडी नेसली होती आणि या पारंपारिक साडीला सुंदर आधुनिक टच दिला होता. या लुकमध्ये मृण्मयीच्या सौंदर्याला चार चॉंद लागले आहेत.
'मन फकिरा' हा नातेसंबंधावर भाष्य करणारा सिनेमा आहे. लग्न या संकल्पनेकडे आजची पिढी कशी बघते आणि त्यांचे त्याविषयीचे विचार काय आहेत, हा चौकटीबाहेरचा विषय 'मन फकिरा' द्वारे मृण्मयी देशपांडे प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहे. या सिनेमात अंकीता मोहन, सुव्रत जोशी, सायली संजीव आणि अंजली पाटील हे कलाकार झळकणार आहेत.
मृण्मयी देशपांडे लिखित-दिग्दर्शित 'मन फकिरा' हा येत्या ६ मार्चला रसिकांच्या भेटीला येतोय.