मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत ब्राह्मण मुलीच दिसतात, इंडस्ट्रीत आहे जातीपातीचं राजकारण -  सुजय डहाके

By  
on  

‘केसरी’ या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शक सुजय डहाके आणि टीमने सिनेमाचं जोरदार प्रमोशन केलय. या प्रमोशन दरम्यान एका प्रसिद्ध न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक सुजय डहाकेनं मराठी सिनेमा आणि मालिका विश्वातील वास्तव समोर आणलयं. प्रसिद्ध मराठी मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत ब्राम्हण मुलींनाच घेतलं जातं, इतर जातीय मुलींना मुख्य भूमिकांसाठी कामं मिळत नसल्याची खंत त्याने व्यक्त केली आहे. 


“सध्याच्या प्रसिद्ध मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत काम करणारी एखादी ब्राम्हण नसलेली अभिनेत्री शोधून दाखवा, यांना जाधव, सोनावणे वैगेरे सापडत नाहीत का ? महाराष्ट्रात एवढ्या एकांकिका होत असतात, जवळपास 500 एकांकिका होतात महाराष्ट्रात. यांना ब्राम्हण अभिनेत्रीच सापडतात” असं म्हणत सुजयने इंडस्ट्रीत जातीपातीचं राजकारण होत असल्याची खंत व्यक्त केली आहे. शिवाय सुजयच्या बाबतीतही असं राजकारण होत असल्याचं तो बोलला. याविषयी बोलत असताना सुजय म्हटला की, “मला कमी वयात पुरस्कार मिळत असल्याचाही काहींना राग आहे, हा डहाके असून कसा काय येतो पुढे याचा राग आहे”
सुजयने या मुलाखतीच्या माध्यमातून मराठी मनोरंजन विश्वातलं हे कटू सत्य समोर आणलं. शिवाय केसरी या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री छाया कदम यांनीही ही खंत यावेळी व्यक्त केली. उत्तम काम करणारे कलाकार या अशा राजकारणामुळे डावलले जात असल्याचं त्या म्हटल्या.


सुजय डहाकेचा ‘केसरी’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला असून कुस्तीसाठी सर्वस्व वाहून घेतलेल्या तरुणाची संघर्षगाथा आहे. 
 

Recommended

Loading...
Share