अभिनेता समीर धर्माधिकारी यांनी आपल्या देखण्या व्यक्तिमत्वासोबतच आपल्या विविधांगी भूमिकांनी आजवर आपली वेगळी छाप उमटवली आहे. ‘तू तिथे असावे’या आगामी मराठी चित्रपटात समीर यांचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. ‘बाबा भाई’ या ‘डॉन’ ची भूमिका समीर यांनी चित्रपटात साकारली आहे. यात समीर धर्माधिकारी यांचा रावडी लूक पहायला मिळतोय. ‘जी कुमार पाटील एंटरटेण्मेंट’ ची प्रस्तुती असलेल्या ‘तू तिथे असावे’ हा चित्रपट येत्या ७ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
ही भूमिका साकारण्यासाठी समीर यांनी चांगलीच मेहनत घेतली आहे. या भूमिकेबद्दल बोलताना समीर सांगतात की, यात मी साकारलेला डॉन हा ‘चांगल्याशी चांगला तर वाईटाशी वाईट’ असा आहे. ग्रे शेड असलेली भूमिका साकारताना मेकअप, बॉडी लँग्वेज, फेशियल एक्स्प्रेशन्स या सगळ्यांकडे खास लक्ष द्यावं लागतं. भूमिका कोणत्याही प्रकारची असली, तरी ती चांगली व्हावी यासाठी कलाकारांना कष्ट घ्यावे लागतात. एकाच इमेजमध्ये अडकून पडायचं नसल्याने ही वेगळी भूमिका स्वीकारल्याचं ते सांगतात.
या चित्रपटात समीर यांच्यासोबत भूषण प्रधान, पल्लवी पाटील, मोहन जोशी, अरुण नलावडे, विजय पाटकर, जयवंत वाडकर, मास्टर तेजस पाटील, श्रीकांत वट्टमवार, अभिलाषा पाटील, विशाखा घुबे हे कलाकार आहेत.
‘तू तिथे असावे’ या चित्रपटाचे निर्माते गणेश पाटील व दिग्दर्शक संतोष गायकवाड आहेत. आकाश कांडुरवार, शरद अनिल शर्मा, प्रशांतजी ढोमणे, सुरभी बुजाडे हे सह-निर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि पटकथा आशिष विरकर यांनी लिहिली आहे. संवाद आशिष विरकर आणि दिपक अंगेवार यांचे आहेत. मंदार चोळकर, डॉ.श्रीकृष्ण राऊत, पार्वस जाधव या गीतकारांनी लिहिलेल्या गीतांना दिनेश अर्जुना यांचे संगीत लाभले आहे. छायांकन बाशालाल सय्यद यांचे असून संकलन मन्सूर आझमी यांचे आहे. कलादिग्दर्शन महेंद्र राऊत आणि गजानन फुलारी यांचे आहे. रोहितोष सरदारे कार्यकारी निर्माते आहेत.
येत्या ७ डिसेंबरला ‘तू तिथे असावे’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.