'एबी आणि सिडी' या सिनेमाच्या निमित्ताने बिग बी अमिताभ बच्चन यांना मराठी सिनेमात पाहण्याची संधी मिळणार आहे. या सिनेमात प्रसिद्ध अभिनेता विक्रम गोखले यांच्यासोबत बिग बींची छोटी मात्र महत्त्वाची भूमिका पाहायला मिळणार आहे. सिनेमाच्या टीझर आणि ट्रेलरमध्ये बिग बींचा फक्त आवाज ऐकायला मिळाला आहे. त्यामुळे सिनेमात त्यांची झलक पाहण्यासाठी आणि त्यांना मराठी बोलताना ऐकण्यासाठी सगळ्यांचीच उत्सुकता वाढली आहे.
या सिनेमात अभिनेत्री सायली संजीवचीही महत्त्वाची भूमिका आहे. या सिनेमाच्या निमित्ताने बिग बींसोबतच्या एका सीनचा भाग झाल्याचा आनंद सायलीला आहे. हा अनुभव सायलीने पिपींगमून मराठीसोबत शेयर केला आहे. यावेळी सायली म्हटली की, “आमचं भाग्य आहे की बिग बींसोबत स्क्रिन शेयर करायला मिळाली. पण एक असा जो सीन आहे जिथे सगळे एकत्र आम्ही आहोत तर त्याचा भाग करियरच्या या टप्प्यावर होणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे.”
ज्या सीनमध्ये सायलीला बिग बींसोबत स्क्रिन शेयर करण्याची संधी मिळाली त्या सीनविषयी सायली सांगते की, “माझ्या आयुष्यातला हा सीन आणि हा प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही कारण मी तिकडे उभी होते. ते आले, जिन्यावरुन उतरून रंगमंचावर उभे राहीले. ते चालत असताना तो प्रवास तर मी बघतच होते. ते जेव्हा रंगमंचावर उभे राहिले तेव्हा ही मी त्यांच्याकडे बघतच होते. मी त्यांना निरखून बघत होते. एखादा माणूस प्रेमात पडल्यानंतर कसा बघतो तशी मी त्यांच्याकडे बघत होते. आणि तेवढ्यात त्यांनीही माझ्याकडे बघीतलं मान हलवून इशारा केला आणि मी घाबरले. मी लगेच त्यांना हात जोडून सॉरी म्हणत इशारा केला. मी त्यावेळी पहिल्या रांगेच्या खुर्चीजवळ उभी होते. त्यांना बघीतल्यानंतर तुम्ही भानावर राहूच शकत नाही. आणि त्यावेळी त्यांनीच मला भानावर आणलं त्यामुळे ती भेट चांगलीच आठवते.” असं म्हणत बिग बींसोबतची ही अविस्मरणीय आठवण सायलीने सांगीतली.
शिवाय अभिनेता अक्षय टंकसाळेही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. त्यानेही पिपींगमून मराठीसोबत त्याचा बिग बींसोबतचा अनुभव शेयल केला. अक्षय सांगतो की, “मी सोशल मिडीयावर पोस्टही केली होती की देवदर्शन झालं. तो अनुभव असा होता जसं आपण देवाच्या सान्निध्यात आहोत. ज्याची भक्ती आपण आयुष्यभर करायचं ठरवतो किंवा ज्याच्याकडे बघून आपण या क्षेत्रात असतो, तो जर कधी समोर आला किंवा त्याच्यासोबत स्क्रिन शेयर करायला मिळाली आणि तेही या वयात ते सगळं स्वप्नचं असतं.”
या सिनेमाच्या निमित्ताने या कलाकारांचं बिग बी अमिताभ बच्चन यांना भेटण्याचं आणि त्यांच्यासोबत काम करण्याचं स्वप्न पूर्ण झालयं. मात्र बिग बींना या निमित्ताने मराठी सिनेमात पाहणं हे त्यांच्या मराठमोळ्या चाहत्यांसाठी स्वप्नपूर्ती असेल एवढं नक्की.