By  
on  

 EXCLUSIVE : ‘महाभारत’ आणि इतर साकारलेल्या भूमिकांपेक्षा चक्रपाणी वेगळा असल्याने साकारली भूमिका - नितीश भारद्वाज

‘समांतर’ या मराठी वेब सिरीजमध्ये ‘महाभारत’ मालिकेतील कृष्ण म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेता नितीश भारद्वाज हे सुदर्शन चक्रपाणी या महत्त्वाच्या भूमिकेत झळकत आहेत. याच वेब सिरीजच्या निमित्ताने नितीश भारद्वाज यांच्यासोबत पिपींगमून मराठीने एक्सक्लुझिव्ह बातचीत केली. यावेळी त्यांनी ही भूमिका निवडण्याचं मुख्य कारणं सांगत या वेब सिरीजचा अनुभवही शेयर केला.


नितीश म्हणतात की, “ या वेब सिरीजमधील माझी भूमिका अत्यंत वेगळी आहे. आत्तापर्यंत महाभारत आणि इतर सिनेमांमध्ये साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका वेगळी असल्याने मी ही वेब सिरीज केली. मला चक्रपाणीची रहस्यमयी भूमिका आवडली. बहुतांश लोकं आपलं भविष्य जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात आणि चक्रपाणीची भूमिका ही याचभोवती फिरते. दिग्दर्शक सतीश राजवाडेने मला या भूमिकेसाठी जो लूक दिला तोही माझ्यासाठी नवीनच होता. सतीशने ही सिरीज सिनेमासारखीच शूट केली आहे, बारीक सारीक गोष्टींवर काम केलं आहे. सतीशने मला माझ्या भूमिकेतील गूढ विकसीत करण्याची मुभा दिली होती. यासाठी मी माझ्या डोळ्यांचा वापर करून त्यातलं गूढ दाखवू शकलो. सिनेमॅटोग्राफर प्रसाद भेंडेने प्रत्येक शॉट सुंदर पद्धतिने शूट केला आहे ज्याने सिरीजचं रहस्य कायम राहतं. असं क्वचितच होतं जेव्हा तुम्हाला एक चांगली भूमिका, चांगला निर्माता, दिग्दर्शक, डिओपी आणि एक चांगला कोस्टार हे एकाच वेळी मिळतं. याबाबतीत ‘समांतर’ने माझं समाधान केलं.”

या वेब सिरीजच्या निमित्ताने टेलिव्हिजन दुनियेत कृष्णाची भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध असणारे दोन कलाकार म्हणजेच स्वप्निल आणि नितीश भारद्वाज या सिरीजच्या निमित्ताने एकत्र पाहायला मिळत आहेत. याविषयी स्वप्निलसोबतचा काय संवाद झाला ? आणि आजही त्यांनी केलेली अजरामर मालिका ‘महाभारत’ मध्ये साकारलेली कृष्णाची भूमिका याविषयीही ते बोलले. ते म्हणतात की, “स्वप्निल आणि मी आता या टप्प्यावर करियरमध्ये पुढे निघून गेलो आहोत.  मी ‘पितृऋण’ या मराठी सिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं. आणि आता मी माझ्या आगामी सिनेमांच्या दिग्दर्शनात, लेखनात लक्ष केंद्रीत करतोय. मी भूतकाळात जगणारा माणून नाही. माँ भगवतीने आपल्या प्रत्येकाला प्रतिभा दिली आहे. म्हणूनच मला आयुष्यात पुढे आणखी बरचं काही करायचयं, म्हणजे आयुष्याच्या शेवटी मी प्रभु चित्रगुप्ताला सांगू शकेल की मी माझ्या क्षमतेनूसार सर्वोत्तम काम केलेलं आहे.”


नितीश भारद्वाज यांनी 1988मध्ये ‘महाभारत’ या अजरामर मालिकेत कृष्णाची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांना कृष्ण म्हणूनच पुढे ओळख मिळाली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘समांतर’ या वेब सिरीजमधील त्यांच्या सुदर्शन चक्रपाणी या भूमिकेचं कौतुक होत आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive