सध्या लहान मुलांचा लाडका कार्यक्रम म्हणून 'अळीमिळी गुपचिळी'ची खुप चर्चा सुरु आहे. या कार्यक्रमात आपले लाडके सेलिब्रिटी मुलांसह हजेरी लावतात आणि धम्माल उडवून देतात. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अतुल परचुरे आणि स्नेहलता वसईकर ही जोडी या बच्चेकंपनींकडून आपले आई-बाबा घरी कसे वागतात, कसे ओरडतात हे जाणून घेण्यासोबतच त्यांच्यासोबत मजेशीर खेळही खेळतात.
अलिकडेच मराठी सुपरस्टार स्वप्निल जोशीने आपल्या कुटुंबासह या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्याची गोड चिमुकली मायरा व तिचा बाबा स्वप्निलने एक खास गाणं सादर केलं. तुम्हालासुध्दा या बापलेकीचा हा गोड गाण्याचा व्हिडीओ नक्कीच आवडेल. मराठी बोल असलेलं हे गाणं स्वप्निल मायराकडून बोलून घेतोय. सर्वांनाच ते भारी आवडलंय, टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या या गाण्याला सर्वांनी भरघोस प्रतिसाद दिला.
लवकरच स्वप्निल व त्याच्या कुटुंबाचा हा भाग आपल्याला छोट्या पडद्यावर पाहता येईल. मागच्या काही आठवड्यांपूर्वीचं उर्मिला व आदिनाथ कोठारे यांची लेक जिजानेसुध्दा आई-वडील व आजोबांसोबत या कार्यक्रमात आपल्या गोड नकलांनी धम्माल उडवून दिली होती.
दरम्यान, स्वप्निल जोशीच्या समांतर या भविष्याचा वेध घेणा-या थरारक आणि रहस्यमयी वेबसिरीजची सध्या खुप चर्चा सुरुय. पहिल्या सीझनला तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर प्रेक्षकांना आता पुढच्या सीझनची आतुरता लागून राहिलीय.