By  
on  

लवकरच प्रेक्षकांच्या 'डोक्याला शॉट'!

'बालक पालक' आणि 'येल्लो' सारख्या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर 'अ व्हिवा इनएन प्रॉडक्शन' आता पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी घेऊन येत आहे. उत्तुंग हितेंद्र ठाकूर यांची निर्मिती असलेला 'डोक्याला शॉट' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच आजवर अनेक नावाजलेल्या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका बजावणारे शिवकुमार पार्थसारथी प्रथमच या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत, तर सुमन साहू यांनी हा चित्रपट चित्रित केला आहे.
सोशल मीडियावर नुकत्याच झळकलेल्या या चित्रपटाच्या पहिल्या कलरफूल लूकमध्ये सुव्रत जोशी, प्राजक्ता माळी, रोहित हळदीकर, गणेश पंडित आणि ओमकार गोवर्धन हे अतरंगी कलाकार दिसत आहेत. चित्रपटातील इतर पात्रही लवकरच आपल्या समोर येतील.

डोक्याला शॉट' मधल्या एका गाण्याच्या शूट साठी सुव्रत जोशी दोन दिवस वसई मध्ये असताना त्याने एक नुकतीच इन्स्टावर पोस्ट टाकली होती. तो म्हणाला होता, "इथे 'डोक्याला शांती' मिळते आहे. वसई किती सुंदर आहे! शांत,रम्य, समृद्ध आणि बहुसांस्कृतिक! कुठल्याही रस्त्यावर दोन मिनिटं चाललं तरी गोव्यात आल्यासारखं वाटतं. मुंबई पासून इतकं जवळ असूनही मुंबईच्या बचबचीतून अलिप्त राहिलय असं वाटतं! "

प्राजक्ता माळीने अभिनयक्षेत्रात मालिकांव्दारे पदार्पण केले होते. तिने 'सुवासिनी', 'बंध रेशमाचे', 'गाणे तुमचे आमचे', 'सुगरण' अशा मालिकांमध्ये काम केले होते. मात्र छोट्या पडद्यावरील 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेत मेघनाच्या भूमिकेतून घराघरात पोहचली. सध्या प्राजक्ताची 'नकटीच्या लग्नाला यायचं हं', ही मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली. या मालिकेतील प्राजक्ताचा खट्याळ अंदाज आणि पारंपरिक लूक रसिकांना चांगलाच भावला. 'खो-खो', 'संघर्ष', 'गोळाबेरीज' 'पार्टी' अशा मराठी सिनेमांमधून प्राजक्ताने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आता ती 'डोक्याला शॉट' या चित्रपटात दिसणार आहे.

'दिल दोस्ती दुनियादारी' ह्या मालिकेतून सुव्रतने रसिकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली. मालिकांसह काही रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन करतानाही तो दिसला. सध्या सुव्रतची भूमिका असलेले अमर फोटो स्टुडिओ हे नाटक रंगभूमीवर गाजत आहे.

चित्रपटाच्या नावावरूनच या चित्रपटात काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार हे कळतंय. त्यामुळे आता हे 'कल्ला'कार प्रेक्षकांच्या डोक्याला काय शॉट देणार आहेत, हे पाहणं प्रचंड औत्सुक्याचं ठरणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive