करोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. परिस्थिती बिकट होतेय. देशभरात २१ दिवस लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. आपण प्रत्येक जण पूर्व खबरदारी म्हणून आज घरी थांबलो आहोत. घरी राहा, सुरक्षित राहा हे धोरण आज प्रत्येकाने काटेकोरपणे पाळले पाहिजे तरच या करोनाच्या विळख्यातून आपण लवकर सुटू शकू. पण त्याचं काय, त्यांना कोण पाहणार….. त्यांची काळजी कोण घेणार ...हो आम्ही मुक्या प्राण्यांबदद्ल बोलतोय. ...जे रस्त्यावर फिरतायत...मिळेल ते खाऊन जगतायत.
या करोना संकटादरम्यान रस्त्यांवर भटकणा-या प्राण्यांची आरोग्याची व खाण्यापिण्याची सोय करण्यासाठी प्रसिध्द डिझाईनर व निर्माता-दिग्दर्शक विक्रम फडणीसने पुढाकार घेतला आहे. त्यांचीच एक पोस्ट अभिनेत्री मुक्ता बर्वेनेसुध्दा शेअर केली आहे व सर्वांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा अशी विनंती केली आहे.
विक्रम फडणीस पोस्टमध्ये म्हणतात, “आम्ही रस्त्यांवर भटकणा-या कुत्रे-मांजर यांच्यासारख्या मुक्या प्राण्यांसाठी अन्न गोळा करतोय. तसंच या प्राण्यांसाठी झटणा-या स्वयंसेवकांना या दरम्यान ग्ल्व्हज, मास्क आणि डेटॉल साबणाचीसुध्दा आवश्यकता आहे, यासाठी निधी गोळा करायचा आहे. मदतकर्त्यांनी माझ्यासह यासाठी संपर्क साधावा.”
त्यामुळे या संकटकालीन परिस्थितीत प्राण्यांचीसुध्दा तेवढीच काळजी घेणं गरजेचं आहे.