कलेप्रती निष्ठा आणि समर्पित भाव असेल तरच तो कलाकार स्वतःच ध्येय साध्य करू शकतो, पण त्याला जोड लागते अथक प्रयत्न, जिद्द आणि आत्मविश्वासाची. अर्थात स्वप्नपूर्तीचा हा प्रवास सोपा कधीच नसतो. आत्मविश्वासाच्या बळावर भावनांची निरगाठ सोडवत स्वप्नं कशी साकार करायची हे सांगू पहाणारा ‘तू तिथे असावे’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
गाण्याची आवड असणाऱ्या एका छोट्या खेड्यातून आलेल्या मल्हार या युवकाचा प्रसिद्ध गायक होण्यापर्यंतचा प्रवास या संगीतमय चित्रपटातून उलगडणार आहे. भूषण प्रधान, पल्लवी पाटील या देखण्या जोडीसोबत मोहन जोशी, अरुण नलावडे, विजय पाटकर, जयवंत वाडकर, समीर धर्माधिकारी, मास्टर तेजस पाटील, श्रीकांत वट्टमवार, अभिलाषा पाटील, विशाखा घुबे हे कलाकार या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.
‘जी कुमार पाटील एंटरटेण्मेंट’ ची प्रस्तुती असलेल्या ‘तू तिथे असावे’ या चित्रपटाचे निर्माते गणेश पाटील व दिग्दर्शक संतोष गायकवाड आहेत. आकाश कांडुरवार, शरद अनिल शर्मा, प्रशांतजी ढोमणे, सुरभी बुजाडे हे सह-निर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि पटकथा आशिष विरकर यांनी लिहिली आहे. संवाद आशिष विरकर आणि दिपक अंगेवार यांचे आहेत. आदर्श शिंदे, नेहा राजपाल, वैशाली माडे, स्वप्निल बांदोडकर, बेला शेंडे, जसराज जोशी, धनश्री बुरबुरे या नामवंत गायकांनी या चित्रपटातली गाणी गायली आहेत. मंदार चोळकर, डॉ. श्रीकृष्ण राऊत, पार्वस जाधव यांनी कथेला साजेशी गीतं लिहिली आहेत. दिनेश अर्जुना यांनी प्रसंगानुरूप चाली देत गीतं संगीतबध्द केली आहेत. पार्श्वसंगीत समीर फातर्फेकर यांचे आहे.
जीतसिंग व प्रवीण सूर्यवंशी यांनी गीताचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. छायांकन बाशालाल सय्यद यांचे असून संकलन मन्सूर आझमी यांचे आहे. कलादिग्दर्शन महेंद्र राऊत आणि गजानन फुलारी यांचे आहे. वेशभूषा कैलाश ब्राम्हणकर यांची आहे. निर्मिती व्यवस्था संगीत गायकर तर कार्यकारी निर्माते रोहितोष सरदारे आहेत.
https://youtu.be/PdzGV4SPTeM
नात्यांची सुरेख सांगड घालत जगण्याचा अर्थ उलगडून दाखवणारा ‘तू तिथे असावे’ ७ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.