मराठी चित्रपटात नवनवीन चेहरे दिसू लागलेत. ही नवीन मंडळी मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करू पाहतायेत. चित्रपटसृष्टीत प्रवेश करणाऱ्या कलाकारांमध्ये एक नवं नाव समाविष्ट झालेय अभिनेत्री दिप्ती धोत्रे हिचे. ‘डोंब’,‘धारा ३०२’ या चित्रपटातील छोट्याशा भूमिकांनंतर महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘मी शिवाजी पार्क आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मुळशी पॅटर्न’ मधून तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. ‘सर्वनाम’, ‘भोंगा’, भिरकीट’ या आगामी चित्रपटांमध्ये दिप्ती महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. तसेच आगामी ‘विठ्ठल’ चित्रपटातही तिच्या नृत्याची झलक प्रेक्षकांना पहायला मिळेल.
दिप्ती या संधीबद्दल बोलताना सांगते की, “मला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती आणि या क्षेत्राबद्दल आकर्षणही होते, याच ओढीने मनोरंजनाच्या क्षेत्रात पदार्पण केले”. सुरुवातीला एडिटर म्हणून काम केल्यानंतर अभिनयाची संधी चालून आली. वेगवेगळ्या चित्रपटांतून मला वैविध्यपूर्ण भूमिका साकारायला मिळणं ही माझ्यासाठी खरंच मोठी अचिव्हमेंट आहे. मला विश्वास आहे की, मी साकारत असलेल्या भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडतील.
आणखी बऱ्याच चित्रपटांमध्ये दिप्तीच्या अभिनयाचे रंग दिसणार आहेत. अर्थात या क्षेत्रात तग धरुन रहायचे असेल तर मेहनतीला, कठोर परिश्रमाला पर्याय नाही हे गणित समजलेल्या दिप्तीला वेगवेगळ्या पठडीतल्या भूमिकांमधून स्वत:ला सिद्ध करायचे आहे.