लॉकडाउनच्या या काळात बहुतांश लोकं जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. यातच प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही त्यांच्या आयुष्यातील एका खास आठवणीला उजाळा दिला आहे.
2004मध्ये आलेल्या अगंबाई अरेच्चा या सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. सिनेमाची हटके कथा, सिनेमातील गाणी, कलाकारांचा अभिनय या एकूण सगळ्यानेच रंगत आणली होती. केदार शिंदे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलय. आणि या सिनेमाची एक खास आठवण त्यांनी सोशल मिडीयावर शेयर केली आहे. या सिनेमातील एका गोंडस मुलीने आणि तिच्या संवादाने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. ही गोंडस मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून ती आहे केदार शिंदे यांची मुलगी सना. सना शिंदे या सिनेमात झळकली होती. आणि याच सिनेमाच्या सेटवरील मुलगी सनाला सीन समजून सांगतानाची आठवण केदार शिंदे यांनी शेयर केली. केदार शिंदे या पोस्टमध्ये म्हणतात की, “ओ काका मीच म्हणाले तुम्हाला वेडा.. पण मनातल्या मनांत म्हणाले. तुम्हाला कसं कळलं?” मी आणि माझी मुलगी सना.. सीन समजवताना.. “अगंबाई अरेच्चा!” २००४”
केदार शिंदे यांनी शेयर केलेली ही गोड आठवण पाहून यावर लाईक्सचा वर्षाव होत आहे.