By  
on  

 Birthday Special : अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्याविषयीच्या या गोष्टी माहित आहेत का ?

कित्येक कलाकारांच्या प्रेरणास्थान असलेल्या अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचा आज वाढदिवस आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही आज त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 


रोहिणी हट्टंगडी यांचा जन्म 11 एप्रिल 1951मध्ये पुण्यात झाला. तर कस्तूरबा गांधी यांचा जन्मही 11 एप्रिल 1869 मध्ये झाला होता. या गोष्टीची आठवण करुन देण्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांनी ‘गांधी’ या प्रसिद्ध सिनेमात साकारलेली कस्तूरबा गांधींची भूमिका. अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना ‘अग्निपथ’ सिनेमातील अमिताभ बच्चन यांची आई अशीही ओळख आहे. तसचं प्रसिद्ध सिनेमा ‘गांधी’ मधील महात्मा गांधी यांची पत्नी कस्तूरबा गांधी यांची भूमिकाही त्यांनी साकारली होती. या दोन्ही भूमिकांसाठी रोहिणी हट्टंगडी या जास्त ओळखल्या जातात. मात्र फक्त हीच ओळख कायम न ठेवता त्यांनी विविध भूमिका आजवर साकारल्या आहेत. रोहिणी हट्टंगडी यांनी मराठी थिएटरपासून त्यांच्या करियरची सुरुवात केली होती. तर अरविंद देसाई यांच्या ‘अजीब दास्तान’ या सिनेमातून त्यांनी सिनेमातील करियरची सुरुवात केली होती.

रोहिणी हट्टंगडी यांना  ‘अर्थ’ आणि ‘अग्निपथ’ या सिनेमांसाठी  सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला हातो. तर 1984मध्ये आलेल्या ‘पार्टी’ या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. ‘गांधी’ सिनेमातील त्यांनी साकारलेल्या कस्तूरबा गांधी यांच्या भूमिकेसाठी त्यांचं प्रचंड कौतुक झालं. या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा बाफ्टा अवॉर्ड मिळाला होता. हा पुरस्कार मिळवलेल्या त्या एकमेव भारतीय अभिनेत्री आहेत. २००४ साली त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला. तर विष्णुदास भावे पुरस्कार या महाराष्ट्रीयन रंगभूमीवरील अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराच्याही त्या मानकरी ठरल्या आहेत.मात्र त्यांना आंतरराष्ट्रीय क्षेत्रावर खरी ओळख मिळाली ती  रिचर्ड अ‍ॅटनबरोंच्या ‘गांधी’ या सिनेमातून. 

नाटक, मालिका आणि सिनेमांमधून त्या आजही विविध भूमिका साकारतात. मात्र नाट्यक्षेत्रात त्या नेहमीच कार्यरत राहिल्या. त्यांनी ‘आविष्कार’ या संस्थेतून ‘चांगुणा’ हे नाटक सादर केले. या नाटकासाठी त्यांना राज्य नाटय़स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. नंतर त्यांनी नितीन सेन यांच्या बंगाली कथेवर आधारित ‘अपराजिता’ हे एकपात्री नाटक केले. नंतर तेंडुलकरांचे ‘मित्राची गोष्ट’, ‘मिडीआ’, ‘वाडा भवानी आईचा’, इप्टानिर्मित प्रेमचंद यांच्या ‘गोदान’ कथेवर आधारित ‘होरी’ अशा अनेक नाटकांत त्यांनी भूमिका केल्या. के. शिवराम कारंथ यांच्या ‘यक्षगान’ लोकनाटय़प्रकारात स्त्रीकलाकाराने काम करण्याचा अग्रमान रोहिणीताईंना लाभला. एवढच नाही तर त्या जपानी ‘काबुकी’ नाटकात काम करणाऱ्या पहिल्या आशियाई अभिनेत्री होत्या. रोहिणी हट्टंगडी यांनी काही काळ कथकली आणि भरतनाट्यमचेही प्रशिक्षण घेतले होते. 

हिंदीतील ‘सारांश’, ‘अजीब दास्ता’, ‘अल्पर्टं पिंटो को घुस्सा क्यों आता है’, ‘मोहन जोशी हाजीर हो’, ‘अर्थ’, ‘पार्टी’, ‘अग्निपथ’, ‘चालबाझ’, जलवा हे त्यांच्या सिनेकरियरमधील महत्त्वाचे सिनेमे. तर ‘चार दिवस सासूचे’, ‘वहिनीसाहेब’, ‘होणार सून मी ह्या घरची’ या त्यांच्या मराठीतील गाजलेल्या मालिका. सध्या ‘डॉक्टर डॉन’ या मराठी मालिकेतही त्या झळकत आहेत.  

'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'मधील त्यांचं अभिनयाचं शिक्षण ते आत्तापर्यंतचा मोठा प्रवास केलेल्या या अनुभवी आणि प्रतिभावंत अभिनेत्री रोहिणी हटंटगडी यांना पिपींगमून मराठीकडून वाढदिवसाच्या  शुभेच्छा 


 

Recommended

PeepingMoon Exclusive