आज संपूर्ण जगाला करोना विषाणूने सळो की पळो करुन सोडलंय. या रोगामुळे जगभरात मरण पावलेल्यांची संख्या काही हजारांच्या घरात आहे. आपल्या देशातही करोनाचे रुग्ण आता झपाट्याने वाढू लागले आहेत. मुंबईत तर ही संख्या लक्षणीय वाढतेय. देशभर लॉकडाऊन काळ जाहीर करण्यात आला आहे. प्रत्येकाला घरीच राहून सुरक्षित राहायचं आहे. सरकारी यंत्रणांसोबतच पोलिस, पालिका कर्मचारी, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारीसुध्दा अहोरात्र नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी झटतायत.
तहान-भूक विसरुन पोलिस उन्हातान्हात नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. त्यांच्या कामाचे तास अविरत आहेत. आपण या लॉकडाऊनमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहावं म्हणून ते त्यांच्या कुटुंबाला सोडून आपली काळजी घेतायत. त्याचं मनोधैर्य वाढवण्याची एक सुजाण नागरिक म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे.
या सर्वांना सलाम करत मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी कृतज्ञता म्हणून एक चैतन्य निर्माण करणारा व्हिडीओ नुकताच शेअर केला आहे. ते म्हणतात, "मानाचा मुजरा तू आहेस म्हणुन आम्ही घरी सुरक्षित आहोत... तू आहेस म्हणुन हा देश लढतोय... तू आहेस म्हणुन माणुसपण जगतंय... माणसातल्या देवा, तुला आमचा मानाचा मुजरा... तू चाल पुढं... तुझं हे योगदान आम्ही कधीच विसरणार नाही..."
सई ताम्हणकर, सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, मुक्ता बर्वे, ललित प्रभाकर, अमृता खानविलकर, मिथिला पालकर. प्रसाद ओक, अभिनय बेर्डे, सिध्दार्थ जाधव, अंकुश चौधरी, गश्मिर महाजनी, स्वप्निल जोशी, स्पृहा जोशी, प्राजक्ता माळी, सिध्दार्थ चांदेकर. जितेंद्र जोशी, अभिनय बेर्डे आदी सर्वच कलाकारांनी या गाण्यात घरुनच सहभाग घेतला आणि पोलिस, वैद्यकीय कर्मचारी या सर्वांचं मनोबल वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी कृतज्ञता व्यक्त केली.
हे चैतन्य निर्माण करणारं स्फर्तिदायक गाणं हेमंत ढोमे आणि समीर विद्वांस यांच्या पुढाकाराने साकारण्यात आलं.