आपले नशीब हे आपल्याच हातात असते, आयुष्यात येणाऱ्या चढ उताराला माणूसच जबाबदार असतो, मात्र नाव नशिबाचे पुढे केले जाते. नशिबाच्या याच संकल्पनेवर आधारीत असलेला एक नवाकोरा नशीबवान' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात सर्वांचा लाडका विनोदवीर अभिनेता भाऊ कदम प्रमुख भूमिकेत असून त्याच्या अभिनयाचा एक वेगळाच रंग यानिमित्ताने अनुभवायला मिळणार आहे.
अमोल वसंत गोळे यांचे दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. भाऊ कदम एका स्वच्छता कामगाराच्या भूमिकेत आपल्याला दिसून येतो. तसेच, त्याच्या हातात त्याचा साथीदार म्हणजे साफ सफाई करणारा झाडूसुद्धा तेवढ्याच दिमाखात चमकत असल्याचे पाहायला मिळते. यामागे एक रहस्यमय कथानक उलगडत असल्याची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतेय. त्यामुळे सिनेमाविषयीची उत्सुकता आणखी शिगेला पोहचली आहे.
लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल प्रस्तुत, फ्लाईंग गॉड फिल्म्स निर्मित, गिरी मीडिया फॅक्टरी यांच्या सहयोगाने ‘नशीबवान’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
https://youtu.be/y2dcwljeJS0
उदय प्रकाश लिखित ‘दिल्ली की दीवार’ या कथेवर आधारीत असलेला ‘नशीबवान’ हा सिनेमा नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच ११ जानेवारी २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमात मिताली जगताप वराडकर आणि नेहा जोशी यांची देखील मुख्य भूमिका आहे.