मराठी भाषेचा ‘उंबरठा’ ओलांडत सशक्त अभिनयाने हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या, तरल आणि संवेदनशील अभिनयाचा आविष्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या ३२व्या पुण्यतिथी दिनाच्या निमित्ताने दुसरा ‘स्वर्गीय स्मिता पाटिल स्मृती पुरस्कार २०१८’ हा स्मिता पाटील यांच्या सशक्त अभिनयाने गाजलेल्या व ४० वर्ष पूर्ण केलेल्या ‘जैत रे जैत’ या चित्रपटाला जाहीर झाला आहे. तसेच ‘स्वर्गीय स्मिता पाटिल कौतुक पुरस्कार २०१८’ हा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मुंबई पुणे मुंबई-३’ या चित्रपटाची अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात ‘जैत रे जैत’ चित्रपटाचे दिग्दर्शक जब्बार पटेल, चित्रपटाचे संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, चित्रपटाची निर्माती उषा मंगेशकर आणि चित्रपटात काम केलेले अभिनेते मोहन आगाशे या मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये स्मिता पाटील यांच्या गाजलेल्या ‘जैत रे जैत’ आणि ‘उंबरठा’ चित्रपटांविषयी या सर्व मान्यवरांमध्ये परिसंवाद रंगणार आहे. ‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार’ सोहळ्याचे हे दुसरे वर्ष आहे.
स्मिता पाटील या प्रतिभावंत कलाकारावर रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. तिच्या चित्रपटांना आणि अविस्मरणीय अभिनयाला रसिकांनी मनापासून दाद दिली. तिला पद्मश्रीसहीत अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. यांच धर्तीवर स्मिता पाटीलचे चाहते या नात्याने तीच्या नावाने पुरस्कार देण्यात यावा या हेतूने विलेपार्लेचे आमदार अॅड. पराग अळवणी, आर्च एंटरटेनमेंटचे विनीत आणि अर्चना गोरे, जीवनगाणीचे प्रसाद महाडकर आणि स्मिताची जवळची मैत्रीण ललिता ताम्हणे यांनी एकत्र येऊन स्मिताच्या ३१व्या पुण्यतिथी दिनाच्या निमित्ताने २०१७ सालापासून तसेच पुढील प्रत्येक वर्षी स्मिता पाटील पुरस्कार देण्याचे जाहीर केले होते. पहिला ‘स्वर्गीय स्मिता पाटिल स्मृती पुरस्कार २०१७’ हा जेष्ठ अभिनेत्री रेखा यांना आणि पहिला ‘स्वर्गीय स्मिता पाटिल कौतुक पुरस्कार २०१७’ अभिनेत्री अमृता सुभाष यांना देण्यात आला होता.
रुपेरी पडद्यावर भारतीय स्त्रीची पर्यायी प्रतिमा साकारणारी सक्षम अभिनेत्री म्हणून स्मिता पाटील यांचे चित्रपटसृष्टीच्या इतिहासात वेगळं स्थान आहे. स्मिता पाटील यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९५५ रोजी झाला. अल्पायुषी ठरलेल्या स्मिता पाटील यांनी विविध व्यक्तिरेखांच्या संवेदना व त्यांचं व्यक्तिमत्व इतक्या प्रभावीपणे आणि सूक्ष्म बारकाव्यांसह अभिव्यक्त केलं की त्यामुळे पडद्यावरील सौंदर्याच्या रुढ संकल्पना दुय्यम ठरल्या. वेगळया मूल्यचौकटी व निष्ठा घेऊन जगणार्या अशा व्यक्तिरेखांना या अभिनेत्रींनी एका अर्थाने मान्यताच मिळवून दिली. स्मिता पाटील यांच्या निधनानंतर मास्को, न्यूर्यॉक, फ्रान्समधील विविध महोत्सवांमध्ये तिच्या चित्रपटांचं ‘सिंहावलोकन’झालं. आंतरराष्ट्रीय स्तरावर रसिक व समीक्षकांकडून इतकी मान्यता मिळणारी ती पहिलीच भारतीय अभिनेत्री ठरली. स्मिता पाटील यांचे १३ डिसेंबर १९८६ रोजी निधन झालं.
मुक्ता बर्वे या मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेल्या आणि यशस्वी अभिनेत्री आहेत. अभ्यासू, स्वतंत्र विचारांची आणि मेहनती अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वे मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टींत ओळखल्या जातात. रंगभूमीवरील मुक्ताची सुरुवात बालपणापासून झाली. तिने पुणे विद्यापीठातून (ललित कला केंद्र) नाट्यशास्त्राची पदवी मिळवली आहे. अनेक गाजलेल्या नाटक, मालिका आणि चित्रपटातून मुक्ताने आपल्या सशक्त अभिनयाचे दर्शन घडवले आहे. यासाठी अनेक पुरस्कारांनी तिला गौरविण्यात आले आहे. आपल्या वैविध्यपूर्ण आणि सहज अभिनयाने मुक्ताने रसिकांच्या मनात प्रेमाचे स्थान मिळवले आहे. टेलिव्हिजन, सिनेमा आणि नाटक अश्या तिन्ही माध्यमांवर जबरदस्त पकड असणार्या अत्यंत मोजक्या अभिनेत्यांमध्ये मुक्ताचे स्थान अग्रक्रमावर आहे.