सध्या जगासह आपल्या देशात करोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतोय. या करोना संकटाशी लढण्यासाठी आपल्या वैद्यकिय व इतर सर्वच सरकारी यंत्रणा युध्दपातळीवर काम करतायत. या दरम्यान करोनाशी झुंजताना वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स आणि मुख्यत्वे परिचारिकांचे मनोबल वाढविण्याची नितांत गरज आहे. म्हणून माजी परिचारिका असलेल्या मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी नुकतीच नायर रुग्णालयात परिचारिका म्हणून सेवा बजावली.
किशोरी यांनी परिचारिकेचा वेश परिधान केला. त्या स्वत: नायर रुग्णालयात गेल्या आणि त्यांनी परिचारिकांशी संवाद साधला तसेच तिथल्या कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. हा कठीण काळ आहे मात्र आपण एकमेकांच्या सोबत राहून काम केलं पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.मुंबईच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौरांचं हे कर्तव्यनिष्ठ प्रेम पाहून सर्वांनीच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. परंतु महापौरांना या रुपात पाहून महाराष्ट्राचे लाडके भाऊजी व अभिनेते आदेश बांदेकर यांना मात्र आपल्या आईच्या आठवणीने गहिवरुन आलं आहे.
सोशल मिडीयावर ट्विटच्या माध्यमातून आदेश बांदेकर म्हणतात, “आई तुझी आठवण येते” या युनिफाॅर्ममधे आईने केलेले संस्कार आणि तिचे कष्ट नजरेसमोर आले,आईने मुंबई महानगरपालिकेच्या नागपाडा क्लिनीक येथे अखेरपर्यंत रूग्णांची प्रमाणिकपणे सुश्रृषा केली. किशोरीताई तुम्हाला,तुमच्या युनिफाॅर्म ला आणि आरोग्य सेवेसह आपत्कालीन सेवेतल्या प्रत्येकाला नमस्कार"
“आई तुझी आठवण येते”
या युनिफाॅर्ममधे आईने केलेले संस्कार आणि तिचे कष्ट नजरेसमोर आले,आईने मुंबई महानगरपालिकेच्या नागपाडा क्लिनीक येथे अखेरपर्यंत रूग्णांची प्रमाणिकपणे सुश्रृषा केली.
किशोरीताई तुम्हाला,तुमच्या युनिफाॅर्म ला आणि आरोग्य सेवेसह आपत्कालीन सेवेतल्या प्रत्येकाला नमस्कार pic.twitter.com/iUpNUxYFmS— Adesh Bandekar - आदेश बांदेकर (@aadeshbandekar) April 27, 2020
आदेश बांदेकर यांना परिचारिका असलेल्या आपल्या आईची तिच्या कष्टांची यानिमित्ताने आठवण आली व ते गहिवरले. महापौर किशोरी पेडणेकर या राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी दहा वर्ष उरणच्या जेएनपीटी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत होत्या.