लॉकडाउनमध्ये घरात बसून मनोरंजनासाठी, हितचिंतकांसोबत गप्पा मारण्यासाठी सोशल मिडीया, वेब, डिजीटल प्लॅटफॉर्मचा जास्त वापर केला जात आहे. त्यातच सोशल मिडीयावर लाईव्ह येऊन गप्पा मारणे हे या लॉकडाउनमध्ये कॉमन झालय. मात्र या गप्पा कशा माहितीपूर्ण होतील आणि त्यातून मनोरंजन आणि माहिती कशी पोहोचेल यावर कला विश्वातील कलाकारांचा भर आहे.
अभिनेत्री स्पृहा जोशी गेले काही दिवस तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून लाईव्ह येत आहे. मात्र ती या लाईव्हमध्ये काही कलाकारांसोबत गप्पा मारते. या गप्पांमध्ये साठवणीतल्या, आठवणीतल्या कविता, पुस्तकं आणि बरंच काही असतं. अवधूत गुप्ते, स्वानंद किरकिरे, सुबोध भावे, अमेय वाघ, अनिता दाते या कलाकारांसोबत स्पृहाने आत्तापर्यंत या लाईव्ह गप्पा केल्या आहेत. स्पृहाने या कार्यक्रमाचं नाव 'खजिना' असं ठेवलय. आणि आणखी काही कलाकारांसोबत स्पृहा हा खजिना घेऊन येत आहे. स्पृहाचा या विविध कलाकारांसोबतच्या गप्पांचा माहितीपूर्ण खजिना हा समृद्ध करणारा आहे. त्यामुळे या लाईव्हला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. घरात बसून कंटाळलेल्या प्रेक्षकांसाठी हा खजिना मनोरंजनासह त्यांच्या आयुष्यात सकारात्मकता आणत असेल यात शंका नाही.