महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने लॉकडाउनच्या काळातही घरात बसून विविध गाणी तयार करण्यात आली आहेत. खासकरुन सोशल मिडीयावर यंदाचा महाराष्ट्र दिन साजर करण्यात आला आहे. लॉकडाउनमुळे विविध कार्यक्रम करता येत नसल्याने सोशल मिडीयावर फोटो, व्हिडीओ पोस्ट करुन महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. यातच विविध वाहिन्यांनी कलाकारांसोबत मिळून महाराष्ट्र दिनानिमित्त घरात बसूनच व्हिडीओ तयार केले आहेत. सोनी मराठीने तयार केलेल्या व्हिडीओचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य सध्या आकर्षणाचा भाग ठरतय. त्यांनी फक्त कलाकारांसोबतच नाही तर त्या कलाकारांच्या मुलांसोबतही हा व्हिडीओ केला आहे.
जय जय महाराष्ट्र माझा या गाण्यावर हा व्हिडीओ सगळ्यांनी घरात राहूनच चित्रीत केला आहे. या व्हिडीओत सुबोध भावे, प्रसाद ओक, सिध्दार्थ जाधव, अमृता खानविलकर, प्राजक्ता माळी, भार्गवी चिरमुले, पुष्कर क्षोत्री या कलाकारांसह अनेक कलाकार आहेत. मात्र हे कलाकार त्यांच्या मुलांसोबत या व्हिडीओत झळकलेआहेत. अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओकनेही हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. मात्र मुलगा मयंकसोबत या व्हिडीओमध्ये असल्याचा प्रसादला प्रचंड आनंद आहे. प्रसाद पोस्टमध्ये लिहीतो की, “नमस्कार... अभिनंदन...!!! आज महाराष्ट्र ६० वर्षांचा झाला!!!आमचे चिरंजीव या निमित्तानी प्रथमच माझ्या सोबत या ( social video ) सादरीकरणात सहभागी झाले...!!! या पेक्षा चांगला मुहूर्त कोणता असावा नाही का??? खूप खूप शुभेच्छा मयंक आणि हा व्हिडिओ शूट करण्याचं श्रेय द्यायलाच हवं... आमच्या सुविद्य पत्नीला, धन्यवाद मंजू...!!” असं म्हणत त्यांनी मुलाचे आणि व्हिडीओ शूट करणाऱ्या पत्निचेही आभार मानले आहेत.
महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीला देण्याचा या व्हिडीओचा प्रयत्न आहे. मात्र या व्हिडीओच्या निमित्ताने आपल्या मुलांसोबत एकत्र झळकल्याचा आनंद आणि समाधान या व्हिडीओतील प्रत्येक कलाकाराला असेल यात शंका नाही.