अभिनेता सिध्दार्थ जाधव त्याच्या अभिनयकौशल्याने प्रेक्षकांच्या हृद्यातील ताईत बनला आहे. त्याच्या हटके अभिनयाने आणि आत्तापर्यंतच्या विविध भूमिकांमधून त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. यातील त्याचं ‘गेला उडत’ हे नाटकही तितकच स्पेशल आहे. नुकतीच या नाटकाला 4 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सिध्दार्थने खास पोस्ट लिहीली आहे. या पोस्टमध्ये सिध्दार्थने दिग्दर्शक केदार शिंदे, निर्माते प्रसाद कांबळी आणि प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. या पोस्टमध्ये केदार शिंदे याच्याविषयी सिध्दार्थ लिहीतो की, “सरांनी प्रत्येक वेळेस मला काहीतरी नवीन दिलंय. मग ते "हसा चकट फू" मधली संधी असेल किंवा "लोच्या झाला रे" मधला "आदिमानव" असेल किंवा "जत्रा" मधला "सिध्दू" असेल किंवा "बकुळा नामदेव घोटाळे" मधला "नामदेव" असेल किंवा "इरादा पक्का" मधला "रोहीत" असेल. एवढंच नाही तर माझं "जागो मोहन प्यारे" हे नाटक आलं होतं तेव्हा "याचे 500 प्रयोग नक्की होणार सिध्दू ". हे पहिलं सांगणारे केदार सर होते...प्रत्येक वेळेस केदार सर कलाकार म्हणून संधी आणि आत्मविश्वास देत राहीले. आणि अजूनही देतायत. "गेला उडत" हे त्यांनी माझ्यासाठी लिहलेलं नाटक. म्हणजे जसं "लोच्या.. त्यांनी संजय सरांसाठी , किंवा "सही रे सही.. भरत सरांसाठी.. तस. माझ्या आयुष्यात केदार सरांच खुप महत्त्व आहे. आणि ते कायम राहणार.”
य़ा नाटकामुळे सिध्दार्थचं आणखी एक स्वप्न पूर्ण झालं आणि त्याचं श्रेयही सिध्दार्थ केदार शिंदे यांना देतो. तो पुढे लिहीतो की, “गेला उडत आणि केदार सरांमुळे माझं आणखीन एक स्वप्न पूर्ण झालं.. ते म्हणजे "स्व.मच्छिंद्र कांबळी" (बाबूजी) यांच्या "भद्रकाली" नाट्यसंस्थेत काम करायची संधी मिळाली.( माझ्या बाबांचही स्वप्न होतं की मी एक तरी नाटक "भद्रकाली" मधून करावं). प्रसाद हा फक्त निर्माता म्हणून नाही तर भावाप्रमाणे सांभाळत होता. आजही ते नातं अबाधित आहे आणि प्रसादचं माझ्या आयुष्यातला स्थान नव्याने सांगायची गरज नाही.”
असं म्हणत या नाटकाशी जोडले गेलेल्या प्रत्येकाचे सिध्दार्थने आभार मानले आहेत. या नाटकाला प्रेक्षकांचं उत्फुर्त प्रतिसाद मिळत असे. सिध्दार्थ जाधवच्या अभिनयातली अफाट उर्जा प्रेक्षकांपर्यंत पोहोचायची आणि त्याचं टाळ्या शिट्यांमध्ये रुपांतर व्हायचं. आणि म्हणूनच सिध्दार्थ पुढे म्हणतो की, “मी पण वाट बघतोय परत "उडत" यायची... संधी मिळाली तर नक्की येणार.”तेव्हा या लॉकडाउननंतर पुन्हा एकदा सिध्दार्धच्या अभिनयाची जादू, ती ऊर्जा पुन्हा रंगभूमीवर कधी पाहायला मिळणार यासाठी नाट्यरसीक आसुसले आहेत.