यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी केलेली मेहनत किंवा तिथपर्यंत येण्याच्या प्रवासाच्या आठवणी कायम असतात. याच आठवणी जागवल्या आहेत अभिनेता मकरंद देशपांडे यांनी. नाटक आणि सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारणारे अभिनेता, दिग्दर्शक मकरंद देशपांडे यांनी नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये मकरंद देशपांडे यांनी अभिनय क्षेत्रात येण्याचा त्यांचा प्रवास सांगीतला आहे. अभिनय क्षेत्रात येण्याआधी मकरंद देशपांडे यांना असलेली खेळाची आणि विशेषकरून क्रिकेटची आवड याविषयी ते बोलले. याविषयी बोलत असताना त्यांचे कोच अब्दुल इस्माईल यांचाही त्यांनी उल्लेख केला. मकरंद देशपांडे सांगतात की, “मी जवळपास 17 वर्षे क्रिकेट खेळत होतो. पूर्ण दिवसभर मी त्या क्रिकेटच्या मैदानातच असायचो. पण माझ्या जेव्हा लक्षात आलं की माझे कोच कधीतरी रिटायर होतील. तेव्हा माझ्या मनात विचार आला की अशी रिटायर व्हावं लागेल अशी कोणतीच गोष्ट नको करायला. मी ज्या महाविद्यालयात शिकत होतो तिथे एक्टरची कमतरता होती. मराठी बोलणाऱ्या एक्टर्सची संख्या कमी होती.”
इथूनच मकरंद देशपांडे यांच्या अभिनय करियरला सुरुवात झाली. मात्र याविषयी बोलत असताना क्रिकेटच्या कोणत्या गोष्टीमुळे त्यांना अभिनयात मदत झाली याविषयी ते सांगतात. ते म्हणतात की, “सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते एक्टर बनण्यासाठी ती म्हणजे ऐकणं. क्रिकेटमुळे माझ्यात ती कला होती कारण मी विकेट किपींग करायचो. ही कला क्रिकेट म्हणजेच माझ्या पहिल्या प्रेमाने दिली होती. आणि माझं काम सुरु झालं. जीवनभर एक काम सुरु झालं ज्यात रिटायरमेंट नसेल ते मला मिळालं.”
एकूणच क्रिकेटविषयी असलेल्या प्रेमातून मिळालेली कला त्यांना अभिनयातही कामी आली. आणि म्हणूनच त्यांनी आत्तापर्यंत साकारलेल्या विविध भूमिकांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं आहे. अभिनयाचं कोणत्याही प्रकारचं शिक्षण न घेता या क्षेत्रात विविध गोष्टी शिकत मकरंद देशपांडे हे आज उत्तम अभिनेत्यांपैकी एक आहेत.