लॉकडाउनमुळे मनोरंजन विश्वाच काम ठप्प आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांसह याचा फटका तंत्रज्ञ आणि इतरांनाही होत आहे. त्यातच लेखकांचाही समावेश आहेच. लॉकडाउननंतर किंवा लवकरच या परिस्थितीवर तोडगा काढून मनोरंजन विश्वाचही काम सुरु होण्याची शक्यता आहे.
दिग्दर्शक केदार शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी #लवकरचभेटू असं लिहीत एक व्हिडीओ पोस्ट केला होता. याच व्हिडीओ सिरीजचा आणखी एक व्हिडीओ त्यांनी पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ त्यांनी मनोरंजन विश्वात काम करत असलेल्या लेखकांसाठी केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून ते लेखकांना सलाम करत आहेत.
ते या व्हिडीओत म्हणतात की, “कागदावर शाई उमटते उलगडत जातं प्रत्येक पान, तुमच्या मनोरंजनाच्या मुहूर्तामध्ये लेखकाचा पहिला मान, कोरोनाच्या संकटाने तोही हतबल आहे. पुढची कथा आहे अंधारात, क्रिएटीव्ह ब्लॉकसारखा हाही ब्लॉक सुटेल आणि लिहीते होतील त्याचेही हात. कथा पुढे होत जाईल असाही दिवस कायम येईल, विश्वासाने म्हणूनच म्हणतोय #लवकरचभेटू.”
हे कलाकार आणि त्यांची टीम प्रेक्षकांच्या मनोरंजनसाठी सज्ज आहेत मात्र परिस्थिती सुरळीत होण्याची वाट त्यांच्यासह सगळेच पाहत आहेत. आणि म्हणूनच लवकरच भेटू म्हणत केदार शिंदे या मनोरंजन विश्वातील लेखकाचं महत्त्व पटवून देणारा व्हिडीओही घेऊन आले आहेत. या व्हिडीओच्या पुढच्या सिरीजमध्ये काय पाहायला मिळेल याचीही उत्सुकता आहेच.