By  
on  

या कारणामुळे 'कागर'चं प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेत्री रिंकु राजगुरूची प्रमुख भूमिका असलेल्या 'कागर' या चित्रपटाविषयी तिच्या फॅन्समध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मात्र, आता फॅन्सना अजून काही काळ वाट पहावी लागणार आहे.रिंकुला पुन्हा ऑनस्क्रीन पाहण्यासाठी आता अजून थोडी कळ सोसावी लागेल. कारण रिंकुची बारावीची परीक्षा असल्याने व्हॅलेंटाइन डेच्या मुहुर्तावर 'कागर' प्रदर्शित होणार नाही.

सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या 'उदाहरणार्थ' या संस्थेने 'कागर' चित्रपटाची निर्मिती केली आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी 'कागर'चं दिग्दर्शन केलं आहे. वडील-मुलाच्या नात्यावर आधारित रिंगण आणि चार शाळकरी मुलांची गोष्ट असलेला यंग्राड हे दोन चित्रपट मकरंदनं या पूर्वी दिग्दर्शित केले होते. रिंगण आणि यंग्राड हे दोन्ही चित्रपट भिन्न पद्धतीचे होते. त्यामुळे आता कागर या चित्रपटाविषयी नावापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे. मूळचे अकलूजचे असलेले आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले मकरंद आणि रिंकु या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.

दोन वर्षांच्या खंडानंतर रिंकुचा चित्रपट येत असल्याने 'कागर'विषयी प्रचंड उत्सुकता आणि चर्चा आहे. १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने 'कागर' प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र, फेब्रुवारीमध्येच रिंकुची बारावीची परीक्षा असल्याने चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्मात्यांनी निर्णय घेतला आहे, असं निर्माते विकास हांडे आणि सुधार कोलते यांनी स्पष्ट केलं.

मला स्वतःला 'कागर'विषयी प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने फॅन्सला भेटण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार होती. मात्र, बारावीची परीक्षा असल्याने मला अभ्यासाला वेळ देणे आवश्यक आहे हे निर्मात्यांनी लक्षात घेतलं आणि १४ फेब्रुवारीला माझ्यासाठी चित्रपट प्रदर्शित करायचा नाही असं ठरवलं. त्यासाठी मला त्यांचे आभार मानावेसे वाटतात. पण आत्ता चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं असलं, तरी लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होईल,' असं रिंकुनं सांगितलं.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive