मराठी सिनेसृष्टीला अनेक आशयघन सिनेमे देणारे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे 'सोहळा' हा सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. नातेसंबंधातील झालेल्या बदलाचे चित्रण या सिनेमात करण्यात आले आहे. आजच्या विभक्त कुटुंबाच्या पार्श्वभूमीवर सिनेमाची कथा आहे. विभक्त कुटुंब, नातेसंबधांवर आधारित अनेक सिनेमे प्रदर्शित झाले. मात्र या सिनेमाची कथा काहीशी हटके आहे. या निमित्ताने गजेंद्र अहिरे व सचिन पिळगावकर हे दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.
अरिहंत प्रॉडक्शन या बॅनरखाली सिनेमाची निर्मिती करण्यात आली असून सोहन बोकाडिया व सुरेश गुंडेचा हे निर्माते आहेत. तर के.सी बोकाडिया यांनी सिनेमाची प्रस्तुती केली आहे. ‘सोहळा’ बद्द्ल निर्माते के. सी बोकाडिया म्हणतात, मराठी भाषेत सिनेमाची निर्मिती करणं हा माझ्यासाठी अत्यंत चांगला अनुभव होता. सोहळामध्ये सचिन पिळगावकर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव अत्यंत चांगला होता. सर्व मराठी कलाकार अत्यंत शिस्तप्रिय असल्याने काम करताना मजा आली.'
या सिनेमात एकूण चार गाणी असून नरेंद्र भिडे यांचे संगीत सिनेमाला लाभले आहे. 'पांस्थथ मी', 'तुझ्या माझ्या आभाळाला', 'नो प्रॉब्लेम' या गाण्यांचा आस्वाद आपल्याला या सिनेमात घेता येणार आहे. पं. रघुनंदन पणशीकर, सचिन पिळगावकर, अवधूत गुप्ते, प्रविण कुंवर, निहिरा जोशी, अभय जोधपूरकर या गायकांनी सिनेमातील गाणी गायली आहेत. विक्रम गोखले, मोहन जोशी, लोकेश गुप्ते, आस्मा खामकर यांच्याही प्रमुख भूमिका सिनेमात पाहायला मिळणार आहे.