लॉकडाउनच्या काळात मनोरंजन विश्वाचं चित्रीकरण बंद असलं तरी या कला विश्वातील कलाकारांनी घरातच राहून विविध व्हिडीओ तयार केले. काहींनी कोरोनाग्रस्त परिस्थितीत कशी काळजी घ्यायला हवी यावर व्हिडीओ केले तर काहींनी घरात बसण्याचं आवाहन करणारे व्हिडीओ केले. यात काही मनोरंजनात्मक व्हिडीओही समोर आले. एवढच नाही तर काही कलाकारांनी घरात बसूनच काही शॉर्ट फिल्मही तयार केल्या.
यातच आता मराठी कला विश्वातील काही अभिनेत्रींनी मिळून एक गाणं तयार केलं आहे. ‘घे उंच भरारी’ असं या गाण्याचं नाव आहे. लवकरच हे गाणं प्रदर्शित होणार आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बेहेरे, स्पृहा जोशी, संस्कृती बालगुडे, भाग्यश्री लिमये, सायली संजीव, ऋतुजा बागवे, प्राजक्ता माळी, पल्लवी पाटील, मयुरी देशमुख, स्वप्नाली पाटील या अभिनेत्री या गाण्यात झळकणार आहेत. या गाण्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच या अभिनेत्री एकत्र झळकणार आहेत.
अर्थात लॉकडाउनमध्ये हे गाणं चित्रीत झालं असल्याने या कलाकारांनी यासाठी घरातूनच चित्रीकरण केलं असेल. या गाण्याविषयीच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “उडायचं स्वप्नं प्रत्येकाचं असतं, पण स्वतः मुक्त होऊन.. ज्यांनी ह्या लॉकडाऊनला आपली strength समजून नव्यानं एक झेप घेतली ते खरे मुक्त!. ह्या मुक्त होण्याला सेलिब्रेट करण्याची, त्या मुक्ततेत स्वतःच्या ध्यासासकट उंच भरारी घेण्याचं स्वप्नं जे बाळगतात त्या सगळ्यांसाठी हे गाणं! "घे उंच भरारी" रेडबल्ब म्युझिक प्रस्तुत हे गाणं घेऊन मी येतेय तुमच्या भेटीला!”
तेव्हा या अभिनेत्रींचं हे गाणं कसं असेल हे पाहण्याची उत्सुकता तर आहेच पण हे सकारात्मक गाणं सध्याच्या परिस्थितीत कित्येकांना प्रेरणा देईल एवढं नक्की.