लॉकडाउनच्या काळात काही जण आपल्या परिवारापासूनही दूर आहेत. लवकरच आपल्या प्रियजनांना आणि कुटुंबाला भेटण्यासाठी ते आसुसले आहेत. गायिका शाल्मली खोलगडे देखील तिच्या गेले 3 महिने तिच्या आई-वडिलांपासून दूर होती. मात्र तिला त्यांना भेटण्याचं निमित्त मिळालं ते वडिलांच्या वाढदिवसाला.
वडिलांच्या वाढदिवसाला खास सरप्राईज द्यायचं शाल्मलीने ठरवलं. मग शाल्मलीची स्वयंपाकघरात सुरु झाली तयारी. शाल्मलीने तिच्या वडिलांसाठी आलू पराठे हा त्यांचा आवडता पदार्थ स्वत:च्या हातांनी बनवला. गाडी घेऊन शाल्मली थेट आई-वडिलांच्या घराखाली आली आणि त्यांना न सांगता हे सरप्राईज दिलं. शाल्मलीचं हे सरप्राईज तिच्या आई-वडिलांना प्रचंड आवडलं. आपल्या लेकीला इतक्या दिवसानंतर भेटल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता. शिवाय शाल्मलीने जेव्हा बॅगेतून आलू पराठ्यांचा डबा बाहेर काढला तेव्हा तर तिचे वडिल प्रचंड आनंदी झालेले दिसले.
शाल्मलीने या सरप्राईचे क्षण तिच्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत. आलू पराठे बनवण्यापासून ते आई- वडिलांना सरप्राईज देण्याचा हा व्हिडीओ तिने सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे.