रंगभूमीवर नाट्यरसिकांकडून कौतुकाची थाप मिळवल्यानंतर आता ‘अनन्या’ मोठ्या पडद्यावर भेटीला येत आहे. कथा तिच मात्र स्वरुप आणि चेहरा वेगळा. अभिनेत्री ऋता दुर्गुळे ‘अनन्या’ नाटकावर आधारित ‘अनन्या’ सिनेमात मह्त्त्वाची भूमिका साकारत आहे.
31 जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होणार होता. मात्र सध्याची कोरोनाग्रस्त आणि लॉकडाउनची परिस्थिती लक्षात घेता या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीखही पुढे ढकलण्यात आली आहे. याविषय़ी स्वत: अनन्या साकारणाऱ्या ऋताने सांगीतलं आहे. सोशल मिडीयावर या सिनेमाच्या टीमने एक व्हिडीओ प्रदर्शित केला आहे. या व्हिडीओत अनन्या लवकरच तिची गोष्ट दणक्यात सांगण्यासाठी येणार असल्याचं म्हटलय. पोस्टमध्ये लिहीलय की, “प्रत्येक चांगल्या गोष्टींसाठी संयम आवश्यक आहे. त्यामुळे योग्य वेळेची वाट पाहूनच ‘अनन्या’ आपल्या भेटीला येईल आणि तेही दणक्यात”
रवी जाधव यांची निर्मिती असलेला आणि प्रताप फड यांचं लेखन, दिग्दर्शन असलेल्या या सिनेमासाठी ऋताने प्रचंड मेहनत घेतली आहे. या संपूर्ण टीमची मेहनत अर्थात मोठ्या स्क्रिनवर पाहणं रंजक असेल. या सिनेमातून ऋता सिनेविश्वात पदार्पण करत आहे. अभिनेत्री ऋतुजा बागवेने अनन्या नाटकातून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. तिच्यावर पुरस्कारांचा आणि कौतुकांचा वर्षाव झाला होता. आणि हिच भूमिका आता पडद्यावर साकारण्याचं आव्हान ऋतासमोर आहे.तेव्हा आता वाट पाहायची आहे ती या सिनेमाच्या प्रदर्शनाची.