कविता लाड मेढेकर ही रसिकांच्या मनावर कायम अधिराज्य गाजवलेली अभिनेत्री. कविता लाड मेढेकर म्हणाल्यावर त्यांचं प्रत्येकजण कौतुकच करतो इतकं प्रेम आजवरील आपल्या कामांतून, व्यक्तिमत्वातून त्यांनी मिळवलंय. वैवाहिक संसाराच्या काही वचनबद्धतेमुळे त्यांनी सिनेमापासून, नाटकांपासून काही काळ विश्रांती घेतली होती. ही त्यांच्यासाठी एक पोषक विश्रांती ठरली आणि आता त्या पुन्हा अभिनय क्षेत्रात कार्यरत झाल्या आहेत. एकीकडे त्या रंगभूमीवर काम करत असताना त्यांचा 'लव यु जिंदगी' हा बहुचर्चित सिनेमा प्रदर्शित होतोय.
या सिनेमबद्दल कविता लाड मेढेकर फार उत्साहाने बोलतात. दिग्दर्शक मनोज सावंत यांनी सिनेमाची कथा त्यांना ऐकवल्यावर त्यांना कथा फार आवडली आणि कविताने सिनेमा करण्यास होकार दिला. याशिवाय सचिन पिळगावकरांसोबत त्यांना काम करण्याची फार इच्छा होती ते सुद्धा एक महत्त्वाचं कारण या सिनेमाच्या निमित्ताने पूर्ण होत आहे.
लव यु जिंदगी सिनेमात त्यांचं नलू नावाचं पात्र आहे. सिनेमात त्या सचिन पिळगावकर यांच्या बायकोची भूमिका करतायत. चित्रपट हा कौटुंबिक मनोरंजक असून यांत नलू या त्यांच्या पात्राचे दोन्ही भावनिक पैलू दर्शवले आहेत. नवऱ्यावर कायम विश्वास ठेवणारी, त्याला पाठिंबा देणारी, नावऱ्यांस हवं ते करायला मुभा देणारी, नवऱ्याच्या तरुण राहण्याच्या प्रयत्नांचं कौतूक आणि कुतूहल वाटणारी साधी पण कणखर नलू त्यांनी सिनेमात साकारली आहे.
वैयक्तिक वैवाहिक आयुष्यात देखील कविता नात्यात एकमेकांना पोषक ‘स्पेस’ देण्यास महत्व देते. चित्रपटातील नलू आणि त्यांच्यात हे साम्य आहे असं त्या म्हणतात. नवऱ्यावर विश्वास टाकणारी नलू आणि विश्वासाचा भंग झाल्यावरची नलू दोन्ही साकारताना त्यांना मजा आली असं कविता म्हणाल्यात.
सिनेमात काम करताना रंगभूमीच्या कामाचादेखील खूप फायदा होतो त्या म्हणतात. सिनेमातदेखील त्यांचा वावर, त्यांनी साकारलेलं नलूचं पात्र बघताना कविता लाड मेढेकर यांचं अभिनयावरील संपूर्ण नियंत्रण आणि रंगभूमीवर वावरण्याचा त्यांचा अभ्यास स्पष्टपणे जाणवतो. रसिकांच्या मनात कायमस्वरूपी जागा मिळवलेली एक अप्रतिम अभिनेत्री आणि अत्यंत गोड, लाघवी, व्यक्तिमत्त्व असलेल्या कविता लाड मेढेकर यांचा “लव यु जिंदगी” सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात ११ जानेवारीला प्रदर्शित होतोय.